कंपनी डिपॉझिट किती सुरक्षित? ( पैशाच्या गोष्टी)

सुहास राजदेरकर
शुक्रवार, 3 मार्च 2017

कंपन्यांच्या मुदत ठेवींकडे आजकाल अनेकजण वळताना दिसत आहेत. बॅंकांपेक्षा थोडा अधिक व्याजदर मिळत असल्याने अनेकांना त्याचे आकर्षण वाटते; पण कंपन्यांमधील गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित आहे का, असा प्रश्‍न कोणी विचारला तर याचे उत्तर दुर्दैवाने "नाही' असेच येते. आज आपल्या आजूबाजूला असे गुंतवणूकदार दिसतात, की ज्यांचे पैसे कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये अडकले आहेत किंवा बुडाले आहेत. कंपन्यांची नावे न घेता बोलायचे झाले, तरी बांधकाम व्यवसाय अर्थात रिअल इस्टेट क्षेत्रातील अशा कंपन्यांची संख्या जास्त आहे. असे का होते? थोडक्‍यात पाहूया.

बहुतेक गुंतवणूकदार बॅंक आणि कंपनी मुदत ठेव यांना एकाच तराजूत तोलतात; पण ते चुकीचे आहे. बॅंक आणि कंपनी मुदत ठेव या दोन्ही गुंतवणुका सारख्याच जोखमीच्या असतात; परंतु बॅंकेमधील मुदत ठेव एक लाख रुपयांपर्यंत सुरक्षित असते. बॅंक अडचणीत आली तरी प्रत्येक व्यक्तीची एक लाख रुपयांपर्यंतची ठेव ही डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे (डीआयसीजीसी) विमा सुरक्षित असते; परंतु कंपनी मुदत ठेवींवर असा विमा नसतो.

स्वतंत्र पतमूल्यांकन संस्थांकडून (उदा. क्रिसिल किंवा इक्रा) कंपन्यांच्या मुदत ठेवींचे मूल्यांकन (रेटिंग) करून एक श्रेणी मिळविणे आवश्‍यक असते. यामध्ये सर्वोच्च श्रेणी ही "एएए' असते, म्हणजेच सर्वांत सुरक्षित. त्याखालील रेटिंग असलेल्या मुदत ठेवींमध्ये जोखीम वाढते. ज्या कंपन्यांच्या मुदत ठेवींवर बाजारामध्ये प्रचलित व्याजदरापेक्षा जरा जास्त किंवा अवाजवी व्याजदर (उदा. 11-13 टक्के) मिळत असेल, तर तेथे जोखीम अधिक असते, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे अशा कंपन्यांचे रेटिंग जरूर तपासावे.

व्याजदराचा किंवा परताव्याचा आकडा समोर दाखविला की गुंतवणूकदार त्यामध्ये गुंतवणूक करायला लगेच तयार होताना दिसतात. उदा. अमुक एका कंपनीच्या मुदत ठेवींवर 9.50 टक्के व्याज मिळत आहे, असे सांगितले तर 100 पैकी 90 गुंतवणूकदार त्यामध्ये गुंतवणूक करायला तयार होतील; परंतु त्यांना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायला सांगितले, तर केवळ व्याज किंवा परताव्याचा आकडा समोर दिसत नाही म्हणून ते तयार होत नाहीत. त्यामुळेच, आजही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक जोखमीची असते; परंतु कंपन्यांच्या मुदत ठेवी तरी सुरक्षित असतात का, याचेही उत्तर "नाही' असेच येते.
तात्पर्य, व्याजदराचा विशिष्ट आकडा समोर दिसत असेल तर ती गुंतवणूक सुरक्षित, असे समजण्याचे कारण नाही.