डिजिटल व्यवहार ₹1590 चा, बक्षीस मिळाले 1 कोटीचे!

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

या योजनेतील विजेत्यांमध्ये तीन ग्राहकांचा आणि तीन व्यापारांचा समावेश आहे. मोदी सरकारने ग्राहकांसाठी 'लकी ग्राहक योजना' आणि व्यापारांसाठी 'डिजिधन व्यापार योजना' सुरु करण्याची घोषणा केली होती.

अर्थविषयक बातम्यांसाठी वाचा - http://www.sakalmoney.com

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या 'लकी ड्रॉ' योजनेचे एक कोटी रुपयांचे बक्षीस नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. रुपे डेबिट कार्ड वापरुन 1590 रुपयांचा डिजिटल व्यवहार करणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाला एक कोटींचे बक्षीस मिळाले आहे. केंद्र सरकारने ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोगातर्फे आयोजित लकी ड्रॉ योजना सादर केल्या आहेत.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात या 'लकी ड्रॉ' योजनेच्या बक्षीसांची सोडत काढण्यात आली. येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेतील विजेत्यांमध्ये तीन ग्राहकांचा आणि तीन व्यापारांचा समावेश आहे. नोटाबंदीनंतर अधिकाधिक लोकांनी रोखीचा वापर कमी करावा आणि डिजिटल पद्धतीने 'कॅशलेस' व्यवहार करावेत यासाठी मोदी सरकारने ग्राहकांसाठी 'लकी ग्राहक योजना' आणि व्यापारांसाठी 'डिजिधन व्यापार योजना' सुरू करण्याची घोषणा केली होती.

राष्ट्रपतींच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ग्राहकांसाठी 'लकी ग्राहक योजने'त पहिले एक कोटीचे बक्षीस सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा ग्राहकाला, दुसर्‍या क्रमांकाचे 50 लाखांचे बक्षीस बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकाला आणि तिसर्‍या क्रमांकाचे 25 लाखांचे बक्षीस पंजाब नॅशनल बँकेच्या एका ग्राहकाला मिळाले आहे. या तिघांनी एटीएम डेबिट कार्डने व्यवहार केला होता. मात्र अद्याप विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. आता त्यांच्या एटीएम कार्डच्या क्रमांकाच्या माध्यमातून ओळख पटवली जाणार आहे. त्याचप्रमाणे व्यापारांसाठी असलेल्या 'डिजिधन व्यापार योजनेत व्यापारांना 50 लाख, 25 लाख आणि 12 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

Web Title: a consumer gets one crore in lucky draw for digital transaction