ग्राहकांनो, फसवणुकीची तक्रार तीन दिवसांतच द्या!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

ग्राहकाने अनधिकृत व्यवहाराची तक्रार केल्यानंतर दहा दिवसांत ही रक्कम ग्राहकाच्या खात्यात बॅंकेने जमा करावी. विमा तडजोडीची प्रतीक्षा न करता हे पैसे जमा करणे आवश्‍यक आहे. इलेक्‍ट्रॉनिक बॅंकिंग व्यवहारांचे "एसएमएस' बॅंकांनी ग्राहकाला पाठविणे बंधनकारक आहे. 
- रिझर्व्ह बॅंक

रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचना; विलंब केल्यास ग्राहकांना भुर्दंड 

नवी दिल्ली:  तुमच्या खात्यावर अनधिकृत इलेक्‍ट्रॉनिक बॅंकिंग व्यवहार झाल्यास त्याची तक्रार तीन दिवसांतच द्यावी लागणार आहे. वेळेत तक्रार केल्यास ग्राहकाच्या खात्यात या व्यवहाराची रक्कम दहा दिवसांत जमा होणार आहे. विलंबाने तक्रार केल्यास मात्र ग्राहकाला 25 हजार रुपयांपर्यंत भुर्दंड सोसावा लागेल.

अनधिकृत इलेक्‍ट्रॉनिक व्यवहारातील जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार एखाद्या वेळी ग्राहकाच्या हलगर्जीपणामुळे गोपनीय माहिती उघड होऊन त्याची फसवणूक होते. अशा प्रकरणांमध्ये बॅंकांकडून अधिकृतरीत्या नोंद होईपर्यंत ग्राहकाला नुकसान सहन करावे लागणार आहे. ग्राहकाने फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर होणाऱ्या तोट्याची जबाबदारी संबंधित बॅंकेकडे असेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

बॅंक अथवा ग्राहक या दोघांचा काही दोष नसताना त्रयस्थ घटकामुळे फसवणूक झाल्यास ग्राहकावर याचे दायित्व असणार नाही. मात्र, यासाठी ग्राहकाला बॅंकेचे कामकाज सुरू असणाऱ्या तीन दिवसांच्या आत तक्रार द्यावी लागेल. बॅंकेच्या चुकीमुळे फसवणूक झाल्यासही ग्राहकावर दायित्व असणार नाही. बॅंक आणि ग्राहक यांच्याऐवजी यंत्रणा पुरविणाऱ्या कंपनीमुळे फसवणूक झाल्यास चार ते सात दिवसांत तक्रार देणे आवश्‍यक आहे. अन्यथा ग्राहकाला 25 हजार रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागेल. ग्राहकाने सात दिवसांनंतर तक्रार केल्यास ग्राहकाचे दायित्व बॅंकेच्या मंजूर धोरणानुसार ठरेल. अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये बचत खाते ग्राहकांवरील दायित्व दहा हजार रुपयांपर्यंत आहे.

ग्राहकाने अनधिकृत व्यवहाराची तक्रार केल्यानंतर दहा दिवसांत ही रक्कम ग्राहकाच्या खात्यात बॅंकेने जमा करावी. विमा तडजोडीची प्रतीक्षा न करता हे पैसे जमा करणे आवश्‍यक आहे. इलेक्‍ट्रॉनिक बॅंकिंग व्यवहारांचे "एसएमएस' बॅंकांनी ग्राहकाला पाठविणे बंधनकारक आहे. 
- रिझर्व्ह बॅंक