रेनॉल्ट, निस्सानने मागविल्या 51 हजार मोटारी परत 

पीटीआय
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

रेनॉल्टने गेल्या वर्षी बाजारात आणलेल्या क्वीडची चांगली विक्री झाली होती. सुरवातीला 800 सीसी आणि नंतर एक हजार सीसी क्षमतेत ही मोटार उपलब्ध करून देण्यात आली. निस्सानची डॅटसन रेडी-गो यावर्षी जून महिन्यात बाजारात दाखल झाली होती.

नवी दिल्ली : रेनॉल्ट आणि निस्सान या कंपन्यांनी रेनॉल्ट क्वीड आणि डॅटसन रेडी-गो या मॉडेलच्या 51 हजार मोटारी परत मागविल्या आहेत. या मोटारींच्या इंधन यंत्रणेत दोष असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

रेनॉल्ट इंडियाची क्वीड ही सर्वाधिक विक्री होत असलेली मोटार आहे. याच्याही 50 हजार मोटारी परत मागविल्या आहेत. डॅटसन रेडी-गो ही मोटार यावर्षी बाजारात दाखल झाली होती. याच्याही 932 मोटारी परत मागविण्यात आल्या आहेत. रेनॉल्टने घेतलेल्या चाचणीत 800 सीसी क्षमता असलेल्या क्वीडच्या इंधन यंत्रणेत दोष असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इंधन यंत्रणेत दुरुस्ती करण्यासाठी या मोटारी परत मागविण्यात आल्या आहेत. इंधन पुरवठ्यात कोणतीही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. संबंधित वितरक याबाबत मोटारींच्या मालकांशी संपर्क साधतील, असे कंपनीने म्हटले आहे. 

कंपनीने स्पष्ट केले नसले तरी परत मागविण्यात आलेल्या मोटारींपैकी केवळ दहा टक्के मोटारींतील यंत्रणांमध्ये दोष असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेनॉल्टने गेल्या वर्षी बाजारात आणलेल्या क्वीडची चांगली विक्री झाली होती. सुरवातीला 800 सीसी आणि नंतर एक हजार सीसी क्षमतेत ही मोटार उपलब्ध करून देण्यात आली. निस्सानची डॅटसन रेडी-गो यावर्षी जून महिन्यात बाजारात दाखल झाली होती. इंधन यंत्रणेतील दोषामुळे यातील 932 मोटारी परत मागविण्यात आल्या आहेत.