बँकेत आता पाच हजारच भरता येणार

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

बँक खात्यांचा वापर करुन रक्कम जमा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु हे निर्बंध पुर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार की नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

मुंबई - देशातील काळा पैसाधारकांना आणखी एक धक्का देत आता केंद्र सरकारने जुन्या नोटा जमा करण्यावर निर्बंध घातले आहेत. आता नागरिकांना 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरुपात केवळ एकदाच 5000 रुपयांची रक्कम बँकेत जमा करता येणार आहे. परंतु प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा करण्यात येणाऱ्या ठेवींवर कोणतेही निर्बंध नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

नोटा जमा करण्याची मुदत संपण्यापूर्वी नागरिकांना एका खात्यावर केवळ 5,000 रुपयांची रक्कम जमा करता येणार आहे. यापेक्षा अधिक रक्कम जमा करावयाची झाल्यास खातेधारकाला बँक अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय, या काळात जर टप्प्याटप्प्याने जमा केलेल्या रकमेचा आकडा 5,000 रुपयांच्या पुढे गेला तर खातेधारकाची चौकशी केली जाईल, असे आरबीआयने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
 
बँक खात्यांचा वापर करुन रक्कम जमा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु हे निर्बंध पुर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार की नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 50 टक्के कर आणि अधिभार भरून बेहिशेबी पैसा आणि बॅंकेतील बेहिशेबी जमा जाहीर करता येणार आहे.