‘डीएलएफ’च्या उपकंपनीतील हिस्सेदारीची ‘जीआयसी’ला विक्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

बँकर्स आणि कायदेशीर सल्लागारांच्या सादरीकरणानंतर लेखा परीक्षण समितीने जीआयसीसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला

नवी दिल्ली: स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनी 'डीएलएफ'ने आपल्या उपकंपनीतील हिस्सेदारीची सिंगापूरच्या 'जीआयसी'ला विक्री करण्याची घोषणा केली आहे. या हिस्साविक्रीतून कंपनीला सुमारे 14,000 कोटी रुपयांची रक्कम मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कंपनीच्या लेखा परीक्षण समितीने जीआयसीच्या सहयोगी कंपनीसोबत करार करण्यास मंजुरी दिली आहे. याअंतर्गत डीएलएफची रेंटल व्यवसायातील उपकंपनी असणाऱ्या डीसीसीडीएलमधील 40 टक्के हिस्सेदारीची जीआयसीला विक्री करण्याचा प्रस्ताव आहे.

"बँकर्स आणि कायदेशीर सल्लागारांच्या सादरीकरणानंतर लेखा परीक्षण समितीने जीआयसीसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला", अशी माहिती डीएलएफ समुहाचे मुख्य वित्त अधिकारी(सीएफओ) अशोक त्यागी यांनी दिली.

येत्या दोन तीन महिन्यात कराराला अंतिम स्वरुप येईल आणि पुढील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत हिस्साविक्रीची प्रक्रिया पुर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.