नोटांमुळे स्वतःला गुन्हेगार समजू नका!

notes
notes

गेल्या आठ नोव्हेंबरपासून बऱ्याच सर्वसामान्य, प्रामाणिक नागरिकांना ५०० आणि १००० च्या काही नोटा घरात बाळगल्यामुळे काहीतरी मोठा गुन्हा केल्यासारखे वाटत आहे. पण या सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की बेहिशेबी पैसा (काळा पैसा) आणि अडीअडणीच्यावेळी उपयोगी ठरावी म्हणून घरात ठेवलेली काही रक्कम (स्वच्छ पैसा) यामध्ये मूलभूत फरक आहे. त्यामुळे आपल्या एकूण उत्पन्नात धरलेला म्हणजेच हिशेबातील काही पैसा (रोकड) आपल्या घरात असेल आणि त्याची नियमानुसार नोंद झालेली असेल, तर त्याबद्दल घाबरण्याचे काहीच कारण नाही. घरात ठेवलेले हे पैसे ५०० किंवा १००० च्या नोटांमध्ये आहेत, म्हणजे लगेच काहीतरी मोठी चूक किंवा गुन्हा झाला आहे, असे अजिबात नाही. त्यामुळे आपले सर्व प्रकारचे उत्पन्न जाहीर केलेल्या नागरिकांनी सद्यःस्थितीत विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. 

बहुतांश लोकांना पुढील काही कारणांसाठी स्वतःजवळ किंवा आपल्या घरी रोख रक्कम ठेवणे आवश्‍यक ठरत असते : १) दैनंदिन कौटुंबिक खर्चासाठी, २) अचानक उद्‌भवणाऱ्या आजारपणासाठी, ३) लग्न, मुंज, वास्तुशांत आदी शुभकार्यासाठी, ४) प्रवासासाठी, ५) घरकाम करणारे किंवा नोकरमंडळींचे वेतन देण्यासाठी, ६) व्यवसाय-धंद्यासाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा ६) इतरांकडून वैध कारणासाठी स्वीकारलेले पैसे, जसे की सोसायटीमधील सभासदांकडून स्वीकारलेले मेंटेनन्सचे पैसे आदी.

काही कारणे अशी असतात, की ती वैध नसली तरीसुद्धा मागील अनेक वर्षे ती ‘समाजामध्ये सर्वमान्य’ आहेत, प्रचलित आहेत. स्थावर मालमत्ता विकून काही भाग  ‘रोकड’ घेतल्यामुळे अथवा स्थावर मालमत्ता विकत घेण्यासाठी काही भाग ‘रोकड’ द्यावी लागणार असल्यामुळे असा पैसा वेगळा ठेवला जातो. परंतु अशी रक्कम हिशेबात किंवा संबंधित मालमत्तेच्या व्यवहारात गृहीत धरलेली असणे अपेक्षित आहे, अन्यथा ती बेहिशेबी ठरते. हिशेबात दाखविलेली रोकड घरी असली तरी सुद्धा आज अशा लोकांमध्ये एक अपराधीपणाची भावना दिसून येते. ‘आपण काही चुकीचे तर केले नाही ना,’ असे त्यांना वाटते. परंतु यात घाबरण्यासारखे काहीही नाही. अशा कारणांसाठी रोकड (स्वच्छ पैसा) बाळगल्याने तुम्ही लाचखोर किंवा काळाबाजार करणारे होत नाही. त्यामुळे मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकून हे पैसे म्हणजेच जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा वैध मार्गाने आपल्या बॅंक खात्यात जमा करायला काहीच हरकत नसावी. त्यासाठी पुरेशी मुदत सरकारने दिली आहे. त्यामुळे लगेच बॅंकेत जाऊन घाई-गर्दी न करतादेखील ही गोष्ट सहजपणे साध्य करता येईल.

प्राप्तिकर खात्याकडून चौकशी झालीच तरीसुद्धा त्यांना तुम्ही खरे कारण सांगू शकता, त्याचे कागदोपत्री पुरावे देऊ शकता. परंतु यासाठी तुम्ही तुमचे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कमटॅक्‍स रिटर्न) त्या त्या वर्षी योग्यरीत्या भरलेले असणे आवश्‍यक आहे. त्यात जर असे उत्पन्न दाखवले गेले नसेल, तर मात्र तुमची पंचाईत होऊ शकते. थोडक्‍यात काय, तर बेहिशेबी पैसा बाळगणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठ्या मूल्यांच्या नोटाबंदीचा हा खटाटोप केला आहे. अशा मंडळींना चिंता, काळजी करू द्या. त्यामध्ये अकारण तुम्ही (किंवा तुमच्या आप्तेष्टांनी) स्वतःची गणना करून घाबरून जाऊ नये, याचसाठी हा लेखनप्रपंच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com