हितरक्षण धोरण चिनी कंपन्यांसाठी घातक

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येण्याआधी खरेदी करार मंजुरी मिळण्याच्या अंतिम टप्प्यात होता. मात्र, नंतर सरकार बदलल्याने सगळी प्रक्रिया थांबली. या कराराला मंजुरी मिळणे शक्‍य नसल्याचे आता सांगण्यात येत आहे. 
- ली डॉंगशेंग, अध्यक्ष, टीसीएल

हॉंगकॉंग : अमेरिकेचे स्थानिक कंपन्यांचे हितरक्षण करणारे धोरण चीनमधील कंपन्यांना जागतिक पातळीवर स्थान मिळविण्यात अडसर ठरत आहे, अशी टीका चीनमधील इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रातील आघाडीच्या टीसीएल समूहाने शुक्रवारी केली. 

टीसीएल समूहाचे अध्यक्ष ली डॉंगशेंग म्हणाले, ''अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी विकत घेण्याची प्रक्रिया टीसीएलकडून सुमारे सहा महिन्यांपासून अधिक काळ सुरू आहे. अद्याप याला अमेरिकी सरकारने मंजुरी दिलेली नाही. आता याला मंजुरी न मिळण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. या कंपनीचा उत्पादन प्रकल्प चीनमध्ये असून, तिच्या उत्पादनांची विक्री अमेरिकेत होते. चीनमधील कंपन्या आंतरराष्ट्रीय होण्यास हितरक्षणवादी धोरण अडसर ठरत आहे.'' 

टीसीएल समूह जगातील तिसऱ्या क्रमांकाचा दूरचित्रवाणी संच निर्माता आहे. यात पहिल्या क्रमांकावर सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि एलजी दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीसीएल इस्त्राईलमधील दहा कंपन्या ताब्यात घेणार आहे. मात्र, कंपनीने याबाबत अधिक तपशील जाहीर करण्यास नकार दिला आहे.