करदात्यांसाठी नवी कार्यसुविधा

प्राप्तिकर विवरणपत्रे दोन वर्षे भरली नसतील, अशांच्या बाबतीत करकपात किंवा करसंकलन जास्त दराने करणे अनिवार्य केले
Dr Dilip Satbhai write Income Tax Act 1961 New functionality for taxpayers
Dr Dilip Satbhai write Income Tax Act 1961 New functionality for taxpayerssakal
Summary

प्राप्तिकर विवरणपत्रे दोन वर्षे भरली नसतील, अशांच्या बाबतीत करकपात किंवा करसंकलन जास्त दराने करणे अनिवार्य केले

प्राप्तिकर कायदा १९६१ मध्ये २०६एबी आणि २०६ सीसीए ही दोन कलमे एक जुलै २०२१ पासून समाविष्ट केली गेली होती. या कलमांअंतर्गत काही विशिष्ट बाबतीत म्हणजे ज्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रे दोन वर्षे भरली नसतील, अशांच्या बाबतीत करकपात किंवा करसंकलन जास्त दराने करणे अनिवार्य केले होते. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल न करणाऱ्या ‘निर्दिष्ट व्यक्ती’ (नॉन-फाइलर्स) संदर्भात करायची करकपात (कलम १९२, १९२ए १९४बी, १९४बीबी, १९४एलबीसी आणि १९४एन अंतर्गत) आणि करसंकलनाच्या (कलम २०६सीसीए) संदर्भात एखादी व्यक्ती गेल्या वर्षात ‘निर्दिष्ट व्यक्ती’ बनू शकत असल्याने कपात करणारा किंवा संकलक आर्थिक वर्षाच्या सुरवातीसच कार्यसुविधेमध्ये सर्वांचे ‘पॅन’ तपासू शकतो, अशी कार्यसुविधा प्राप्तिकर विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या १८ मे २०२२ रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) परिपत्रक क्रमांक १०/२०२२ जारी केले आहे, ज्यामध्ये प्राप्तिकर कायदा १९६१च्या कलम २०६एबी आणि कलम २०६ सीसीए नुसार करकपात करणाऱ्यांसाठी किंवा कर संकलकांसाठी अनुपालन सुटसुटीत करण्यासाठी विकसित केलेल्या या कार्यसुविधेचा वापर करता येणार आहे. या कार्यसुविधेमुळे करकपात व करसंकलन करणाऱ्या करदात्यांना खूपच दिलासा मिळणार असून, प्रत्येक व्यक्तीचे विवरणपत्र गेल्या वर्षात दाखल झाले की नाही, हे तपासण्याची जबाबदारी आता त्याला अधिक कार्यक्षमतेने व खूप कमी वेळात करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक ‘पॅन’ची तपासणी करण्याची डोकेदुखी संपुष्टात येणार असल्याने नवी सुविधा त्याच्या पथ्थ्यावर पडणार आहे. त्यातच काही वजावटदार वा करसंकलक त्यांच्या उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्याचा प्रत्यक्ष पुरावा सादर करण्यास सरधोपटपणे सांगत आहेत. त्यासाठी ही कार्यसुविधा वरदान ठरणार आहे.

उदाहरणार्थ, करकपात करणाऱ्या वा करसंकलन करणाऱ्या करदात्या वजावटदाराकडे १० हजार विक्रेते आहेत; ज्यांच्याशी त्यांचे व्यवहार आहेत. आता नव्या कार्यसुविधेनुसार, करदाता मोठ्या प्रमाणात म्हणजे संकेतस्थळावरील ‘बल्क सर्च मोड’मध्ये तपासणी करू शकतो आणि एका झटक्यात या सर्व १० हजार ‘पॅन’च्या संदर्भात त्यांनी विवरणपत्र दाखल केली आहेत की नाही, याची खातरजमा करून आवश्यक असलेली माहिती मिळवू शकतो. या १० हजार ‘पॅन’पैकी समजा पाच ‘पॅन’ कायद्याच्या अंतर्गत निर्दिष्ट व्यक्ती आहेत, असे निदर्शनास आल्यास उर्वरित ९९९५ ‘पॅन’च्या संदर्भात हे स्पष्ट होईल की ते त्या आर्थिक वर्षासाठी निर्दिष्ट व्यक्तींच्या यादीत नाहीत. आर्थिक वर्षात विनिर्दिष्ट व्यक्तींच्या यादीत कोणतेही नवे नाव जोडले जाणार नसल्यामुळे, वजा करणाऱ्याला खात्रीशीर सांगता येते, की हे ९९९५ ‘पॅन’ त्या आर्थिक वर्षात निर्दिष्ट व्यक्तींच्या यादीबाहेर राहतील. अशा प्रकारे, वजा करणाऱ्याला त्या आर्थिक वर्षात या ९९९५ ‘पॅन’च्या संदर्भात पुन्हा संबंधित व्यक्तींनी प्राप्तिकर विवरणपत्र भरली आहेत की नाही, हे तपासण्याची गरज नाही, असे या परिपत्रकात स्पष्ट केल्याने करदात्यांची मोठी सोय झाली आहे. तथापि, विशिष्ट व्यक्तींचे पाच ‘पॅन’ या आर्थिक वर्षात यादीतून त्यांनी विवरणपत्र भरल्यास यादीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी करकपात किंवा करसंकलनाच्या वेळी फक्त यांची पुन्हा तपासणी करणे आवश्यक आहे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. सबब, नवी कार्यसुविधा करदात्यांचे श्रम वाचविणार असल्याने स्वागतार्ह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com