अॅमेझॉनवर भारतीय उत्पादाकांनी मारली बाजी

अॅमेझॉनवर भारतीय उत्पादाकांनी मारली बाजी

नवी दिल्ली :अॅमेझॉन या आघाडीच्या वस्तूंच्या ऑनलाईन खरेदी-विक्री संकेतस्थळावर जगभरात माल विकणाऱ्या भारतीय निर्यातदारांच्या व्यवसायात 2017 साली 224 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अॅमेझॉनने नुकतीच या संदर्भातली माहिती जाहीर केली. भारतातील जवळपास 32,000 विक्रेते अॅमेझॉनच्या माध्यमातून 9 कोटींहून अधिक उत्पादने जगभरात विकतात. त्यात मुख्यत्वे अमेरिका, मेक्सिको, स्पेन आणि जपान यांसारख्या देशांचा समावेश आहे.

ऑनलाईन पोर्टलवरून केल्या जाणाऱ्या विक्रीत भारताचे विशेष स्थान आहे. स्थानिक बाजारपेठबरोबरच जागतिक बाजारपेठेतसुद्भा भारतीय उत्पादकांनी मोठी आघाडी घेतली आहे, असे मत अॅमेझॉन इंडियाचे महाव्यवस्थापक आणि संचालक गोपाल पिल्लई यांनी व्यक्त केले. भारताची उत्पादन क्षमता प्रचंड आहे. विशेषत: भारतात तयार करण्यात आलेले कपडे, चामड्याच्या वस्तू, रत्ने, दागिने यांना परदेशात मोठी मागणी असल्याचेही पिल्लई यांनी सांगितले. ते अॅमेझॉनच्या 'एक्सपोर्ट डायजेस्ट 2017' या अहवालाच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमात बोलत होते.

या अहवालात, भारतीय निर्यातदारांनी वस्तूंच्या निर्यातीत घेतलेली आघाडी आणि जगभरात लोकप्रिय असणाऱ्या भारतीय उत्पादनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विभागवार विक्रीनुसार उत्तर विभागाने निर्यातीत 114 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पश्चिम, दक्षिण आणि पूर्व विभागाने अनुक्रमे 112 टक्के, 81 टक्के, 74 टक्के वाढ नोंदवली आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अॅमेझॉनवरून केलेल्या निर्यातीत आघाडी घेतली आहे. तसेच शहरी भागात दिल्ली, मुंबई, बेंगालूरू, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांनी विक्रीत आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल इंदूर, सुरत, अहमदाबाद, गाझियाबाद आणि पुणे या शहरांनी मोठ्या प्रमाणावर अॅमेझॉनचा वापर करत जगभरात उत्पादने पोचवली आहेत.

भारतातील गृहशोभेच्या वस्तू, डिनरवेअर, तांब्याच्या वस्तू, पारंपारिक पोशाख, महिलांचे कपडे यांना जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे भारतीय चादरीचा उपयोग समुद्रकिनाऱ्यांवर टॉवेलसारखा आणि भिंतीवर टांगण्यासाठी केला जातोय. तर शुद्ध तूपाचा वापर कॉफीच्या वेगवेगळ्या मिश्रणांची चव वाढवण्यासाठी केला जातो.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यावसायिकांनी सीमाशल्क धोरणात जर शिथिलता आणली गेली तर त्याचा उपयोग व्यापारवृद्धीसाठी होईल असे मत व्यक्त केले वस्तूंच्या विक्रीवर सीमाशुल्क भरावे लागते मात्र विकलेला माल परत आल्यास त्यावर देखील सीमाशुल्क भरावे लागते. त्याचा मोठा फटका निर्यातदारांना बसतो, असेही उपस्थित व्यावसायिकांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com