फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर पुन्हा ‘जैसे थे’च

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

अमेरिकन जॉब मार्केट व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत किंचित सुधारणा झाल्यानंतर व्याजदरवाढीचा मार्ग खुला होईल, असे फेडरल बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने काल (बुधवार) पार पडलेल्या बैठकीत व्याजदरात कोणतेही बदल केले नसून, पुन्हा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजदर पुन्हा एकदा शून्याच्या जवळपासच कायम ठेवले आहेत. यामुळे भारत आणि अन्य विकसनशील देशांना दिलासा मिळाला आहे. परंतु बैठक संपल्यानंतर जाहीर केलेल्या निवेदनात मात्र फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्ष्य जेनेट येलेन यांनी डिसेंबरमध्ये दरवाढीचे संकेत दिले आहेत.

यू्एस फेड व्याजदर 0.5 टक्के कायम ठेवला आहे. शिवाय डिस्काउंट रेट 1 टक्के आणि फेड फंड रेंज 0.25-0.50 टक्क्यावर स्थिर ठेवण्यात आला आहे. फेडरल रिझर्व्हची पुढील बैठक 13-14 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे पुढील बैठकीत व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

अमेरिकन जॉब मार्केट व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत किंचित सुधारणा झाल्यानंतर व्याजदरवाढीचा मार्ग खुला होईल, असे फेडरल बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

शिवाय, फेडरल रिझर्व्हने सध्या जागतिक बाजारपेठेत मंदावलेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करत बाजारात जोखीम वाढत असल्याचे प्रतिपादन केले आहे. तसेच वर्षभर जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव कायम राहण्याचा अंदाज बँकेने व्यक्त केला होता. अमेरिकी अर्थव्यवस्था आता सुधारत आहे. परंतु हे चित्र किती काळ टिकून राहील हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे मत बँकेच्या प्रमुख जेनेट येलेन यांनी व्यक्त केले.