ईबेचा भारतीय व्यवसाय आता फ्लिपकार्टकडे!

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

फ्लिपकार्ट आणि भारतासाठी हा एक लँडमार्क करार आहे. देशातील तंत्रज्ञान प्रणाली विकसित होत असून तिला सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यात यश येत आहे याचाच हा पुरावा आहे...

बंगळुरु: ऑनलाईन बाजारपेठ फ्लिपकार्टने ईबे इंडियाचा व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, कंपनीने नव्या गुंतवणूक फेरीत मायक्रोसॉफ्ट, टेन्सेन्ट आणि ईबे या बड्या कंपन्यांकडून तब्बल 1.4 अब्ज डॉलरचा निधी उभा केल्याची माहिती दिली. यानंतर आता कंपनीचे बाजारमूल्य 11.6 अब्ज डॉलरएवढे झाले आहे, अशी माहिती कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

फ्लिपकार्टला गेल्या दशकभरात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे, एखाद्या इंटरनेट कंपनीने एवढा निधी उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीने  ईबेसोबत विशेष धोरणात्मक करार केला आहे. याअंतर्गत ईबे फ्लिपकार्टमधील इक्विटी हिस्सेदारीसाठी रोख पैसे मोजणार आहे आणि आपल्या भारतीय व्यवसायाची फ्लिपकार्टला विक्री करणार आहे. या व्यवहारानंतरदेखील ईबे.इनचे कामकाज स्वतंत्रपणे सुरु राहणार आहे.

"फ्लिपकार्ट आणि भारतासाठी हा एक लँडमार्क करार आहे. यामुळे आमचे तंत्रज्ञानाधिष्ठित कौशल्य, नावीन्यपुर्ण मानसिकता आणि पारंपारिक बाजारपेठांना आव्हान देण्याची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. देशातील तंत्रज्ञान प्रणाली विकसित होत असून तिला सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यात यश येत आहे याचाच हा पुरावा आहे," असे प्रतिपादन फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिनी बन्सल यांनी केले आहे.

ईबेसोबत भागीदारीमुळे फ्लिपकार्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्ताराची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, कंपनीच्या ग्राहकांना ईबेच्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांची व्हरायटी उपलब्ध होईल आणि ईबेच्या ग्राहकांना फ्लिपकार्टवरील विक्रेत्यांची विशेष भारतीय उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

Web Title: Flipkart acquires eBay India