अन्नधान्ये, तृणधान्ये, दूध 'GST'मधून वगळले

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

बैठकीच्या पहिल्या दिवशी 1 हजार 211 वस्तूंपैकी केवळ सहा वस्तूंवरील करदर आज निश्‍चित झाले नाहीत. उद्या सोने, पादत्राणे, ब्रॅंडेड वस्तू, पॅकबंद खाद्यपदार्थ आणि विडी यावरील कराचा दर ठरविण्यात येईल.
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

श्रीनगर - अन्नधान्य, तृणधान्ये आणि दूध वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) वगळण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषदेची दोनदिवसीय बैठक आज येथे सुरू झाली. या बैठकीत सहा वस्तू वगळता सर्व वस्तूंचे करदर निश्‍चित करण्यात आले. दूध आणि दही जीएसटीतून वगळण्यात आले असून, मिठाईवर केवळ पाच टक्के कर असेल. दैनंदिन वापराच्या वस्तू साखर, चहा, कॉफी (इन्स्टंट कॉफी वगळून) आणि खाद्य तेलांवर जीएसटीमध्ये सध्या एवढाच पाच टक्के कर आकारण्यात येईल. जीएसटीतून वगळल्याने अन्नधान्ये विशेषत: गहू आणि तांदळाचे भाव कमी होणार आहेत. कारण गहू आणि तांदळावर काही राज्ये मूल्यवर्धित कर आकारत होती.

केशतेल, साबण आणि टूथपेस्ट यांच्यावर सध्या राज्य व केंद्राचा मिळून एकूण 22 ते 24 टक्के कर आकारण्यात येतो. जीएसटीमध्ये त्यांच्यावर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. शीतपेये आणि मोटारींवर 28 टक्के कर आकारण्यात येईल. छोट्या मोटारींवर 1 टक्का, मध्यम आकाराच्या मोटारींवर 3 टक्के आणि आलिशान मोटारींवर 15 टक्‍क्‍यांपर्यंत उपकर आकारण्यात येणार आहे. यासोबत सर्वाधिक 28 टक्के कराच्या चौकटीत एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांचाही समावेश आहे. जीवनावश्‍यक औषधांवर केवळ 5 टक्के कर आकारण्यात येईल.

बैठकीच्या पहिल्या दिवशी 1 हजार 211 वस्तूंपैकी केवळ सहा वस्तूंवरील करदर आज निश्‍चित झाले नाहीत. उद्या सोने, पादत्राणे, ब्रॅंडेड वस्तू, पॅकबंद खाद्यपदार्थ आणि विडी यावरील कराचा दर ठरविण्यात येईल.
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री