‘डीमार्ट’च्या यशाचे गमक

गौरव मुठे
गुरुवार, 23 मार्च 2017

अॅव्हेन्यू सुपरमार्टस्‌ लि. अर्थात "डीमार्ट'च्या शेअरची कालच (मंगळवार) शेअर बाजारात 604.4 रुपयांवर दणदणीत नोंदणी झाली. गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट वाढीसह कंपनीच्या शेअरची नोंदणी झाली आहे. कंपनीने नोंदणीसाठी प्रतिशेअर 299 रुपयेएवढी इश्यू प्राइस निश्चित केली होती.

अॅव्हेन्यू सुपरमार्टस्‌ लि. अर्थात "डीमार्ट'च्या शेअरची कालच (मंगळवार) शेअर बाजारात 604.4 रुपयांवर दणदणीत नोंदणी झाली. गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट वाढीसह कंपनीच्या शेअरची नोंदणी झाली आहे. कंपनीने नोंदणीसाठी प्रतिशेअर 299 रुपयेएवढी इश्यू प्राइस निश्चित केली होती.

'डीमार्ट'च्या शेअर बाजारातील नोंदणीनंतर 'डीमार्ट'चे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक राधाकिशन दमानी चर्चेत आले आहेत. डीमार्ट ही भारतातील किराणा व खाद्यपदार्थ विभागातील आघाडीची रिटेल चेन आहे. शेअर बाजारातील नोंदणीनंतर दमानी एका रात्रीत देशातील टॉप-20 अब्जाधीशांच्या रांगेत जाऊन बसले आहेत. संपत्तीच्या बाबतीत दमानी यांनी अनिल अग्रवाल, अनिल अंबानी, गोदरेज परिवार आणि राहुल बजाज यांना मागे टाकले आहे. दमानी आता देशातील 17 वे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती ठरले आहे. त्यांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जीवनात पुढील धोरणांचा अवलंब केला आहे. त्यांच्या यशस्वी होण्याच्या मागे पुढील तत्वांचा त्यांच्यावार खूप मोठा प्रभाव आहे.

 दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष ठेवा

वॉरन बफे प्रमाणे, दमानी यांचा देखील दीर्घकाळ गुंतवणुकीवर अधिक भरवसा आहे. उद्योजक झाल्यानंतर देखील दमानी यांनी दीर्घकाळ गुंतवणुकीबाबतचा दृष्टिकोन कायम ठेवला आहे. डी-मार्टचा विस्तार करण्यासाठी ते कोणत्याही शॉर्टकटवर विसंबून राहिले नाही. याचा उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी डी-मार्टचा जलद विस्तार करण्यासाठी कधीही भाड्याने किंवा कराराने स्टोअर्स घेतले नाही. भाडे कराराने स्टोअर्स घेणे टाळून त्यांनी भाडेपोटी द्यावा लागणार्‍या पैशाची बचत करून स्वता:चे स्टोअर्स उभे केले.

लहान तेच सर्वोत्तम

दमानी यांनी लहान व्यवसायापासून सुरूवात केली. विस्तार करण्यासाठी उतावीळपणा न करता त्यांनी लहान उद्योगावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांना पुरवठा साखळी सुधारून त्यावर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले. परिणामी अगदी पहिल्या दिवसापासून कंपनीला नफा मिळाला. स्थापनेपासून गेल्या 15 वर्षात कंपनीने प्रत्येकवर्षी नफा नोंदवला आहे.

 तुमच्या जवळच्या लोकांना जपा

दमानी यांनी 'अपना बाजार' या पुरवठादार चेनची खरेदी केली. परिणामी विक्रेते आणि पुरवठादार यांच्याशी दमानी यांनी सलोख्याचे आणि वैयक्तिक संबंध निर्माण केले. त्यामुळे स्टोअर्समध्ये कधीही मालाचा तूटवडा निर्माण झाला नाही.

कमीत खरेदी आणि स्वस्तात विक्री

 दमानी यांनी व्यवसाय करताना वस्तूची कमी रुपयात खरेदी आणि स्वस्तात विक्री हे सूत्र कायम पाळले. आणि तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. लोकांच्या रोजच्या आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची त्यांनी स्वस्तात विक्री सुरू केली. परिणामी त्यांच्याकडे येणारा ग्राहक वर्ग वाढला. शिवाय ते त्यांच्या मालाच्या पुरवठादार कंपन्यांना दर आठवड्याला माल खरेदीचे पैसे देऊ लागले. त्यामुळे पुरवठादारांकडून त्यांना अधिक स्वस्तात मालाचा पुरवठा होऊ लागला. तो नफा त्यांनी आपल्या ग्राहकांना देखील हस्तांतरित केला.

 स्थानिकांना वाव द्या

व्यवसाय यशस्वी होण्याचे आणखी एक सूत्र म्हणजे स्थानिकांना वाव. दमानी यांनी स्थानिकांना आपल्या व्यवसायात संधी देऊ केली. स्थानिक पुरवठादाराकडून ते माल खरेदी करत. त्यामुळे वेळेची आणि पैशाची बचत झाली.

कासवगतीने पुढे जात रहा

डी-मार्टने 16 वर्षांपूर्वी व्यवसायाला सुरूवात केली. अजूनही काही राज्यांमध्ये फक्त 119 स्टोअर्स आहेत. अंबानी किंवा बियाणी यांच्या बिग बझारच्या तुलनेत कमी स्टोअर्स आहेत. जलद विस्तारापेक्षा दमानी यांनी कासवगतीने विस्ताराचे धोरण अवलंबले. मात्र 16 वर्षात डी-मार्टचे एकही स्टोअर बंद पडलेले नाही.

डीमार्ट म्हणजेच भारतातील 'वॉलमार्ट'

डीमार्ट ही कंपनी किराणा व खाद्यपदार्थ विभागातील सर्वांत जास्त नफा कमावणारी कंपनी आहे. 41 शहरांमध्ये 119 स्टोअर्स असून, 21 वितरण केंद्रे आणि 6 पॅकिंग केंद्रे आहेत. वैशिष्ट्य असे, की अधिकाधिक स्टोअर्स ही भाडे तत्त्वावर न चालविता मालकी तत्त्वावर चालविली जात असल्याने नफा खूप वाढतो आहे. कंपनीच्या एकूण विक्रीच्या 50 टक्के विक्री खाद्यपदार्थ, 20 टक्के होम आणि पर्सनल केअर प्रॉडक्‍ट्‌स आणि 27 टक्के कपडे व इतर व्यवसायातून होते. मध्यमवर्गीय ग्राहक हा कंपनीचे प्रमुख लक्ष्य असल्यामुळे दैनंदिन गरजा भागविणारी उत्पादने कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देणे हे प्रमुख धोरण आहे. 2012 पासून कंपनीची विक्री प्रतिव्यवसाय क्षेत्र (चौरस फूट) रु. 15,324 ते 2016 मध्ये रु. 28,136 इतकी वाढली आहे; तसेच मागील पाच वर्षांत निव्वळ नफा सीएजीआर 51.85 टक्‍क्‍यांप्रमाणे वाढला आहे. इतकेच नव्हे; तर हा नफा मजबूत "कॅश फ्लो'सह असल्यामुळे पुरवठादारांना वेळेआधीच पैसे मिळतात व कंपनीला त्यातून भरपूर डिस्काउंट मिळतो.