‘जनरल मोटर्स’ची एक अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीला स्थगिती

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

ग्राहकांचा बदलता कल लक्षात घेऊन आम्ही भविष्यातील उत्पादन पोर्टफोलिओचा संपुर्ण आढावा घेत आहोत. आमचा भक्कम पोर्टफोलिओ तयार होईपर्यंत तोपर्यंत नव्या उत्पादनांसाठीच्या गुंतवणूक योजनेला स्थगिती देण्यात आली आहे

नवी दिल्ली: देशातील बाजारपेठेतील स्थान उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘जनरल मोटर्स‘ने देशातील 6,400 कोटी रुपयांच्या गुंतवणूक योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सध्या भविष्यातील उत्पादन पोर्टफोलिओचा आढावा घेण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

"ग्राहकांचा बदलता कल लक्षात घेऊन आम्ही भविष्यातील उत्पादन पोर्टफोलिओचा संपुर्ण आढावा घेत आहोत. आमचा भक्कम पोर्टफोलिओ तयार होईपर्यंत तोपर्यंत नव्या उत्पादनांसाठीच्या गुंतवणूक योजनेला स्थगिती देण्यात आली आहे," अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे.

दोन वर्षांपुर्वी कंपनीने या गुंतवणूकीसंदर्भात घोषणा केली होती. गुजरातमधील हलोल येथील मोटारनिर्मितीचा कारखाना बंद करून यापुढील देशातील सर्व उत्पादन तळेगाव(पुणे) येथील कारखान्यातूनच करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, पुढील पाच वर्षांत ‘शेव्हरोलेट‘चे दहा नवी मॉडेल बाजारात आणण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती.

जनरल मोटर्सच्या भारतातील उपकंपनीला आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये सुमारे 1,003 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.  कंपनी आता 'शाश्वत नफा' मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेच व्यवसायासाठी पूरक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.