काही मिनिटांतच मिळणार ‘पॅन’!

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

व्यवसाय ओळख क्रमांकही झटपट
'सीबीडीटी' आणि कंपनी कामकाज मंत्रालयाने नव्या कंपन्यांना पॅनकार्ड देण्यासाठी एकत्र उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत नव्या कंपन्यांना चार तासांत पॅन दिले जात आहे. आता नव्या कंपन्यांना व्यवसाय ओळख क्रमांकही याच पद्धतीने देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

नवी दिल्ली : तुम्हाला लवकरच काही मिनिटांत पॅन मिळणार असून, प्राप्तिकरही स्मार्टफोनद्वारे भरता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यासंदर्भात पावले उचलली आहेत.

"सीबीडीटी'ने करदात्यांसाठी करप्रणाली सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून आधारच्या "ई-केवायसी' सुविधेचा वापर करुन पॅन काही मिनिटांत मिळणार आहे. या आधार "ई-केवायसी'मध्ये व्यक्तीचा पत्ता, बायोमेट्रिक माहिती लगेचच मिळणार आहे. "ई-केवायसी'च्या आधारे सिमकार्ड दिले जाऊ शकत असेल, तर त्याप्रमाणे पॅनही दिले जाईल. सध्या पॅनकार्ड मिळण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतात. "ई-केवायसी'च्या आधारे पाच ते सहा मिनिटांत पॅन क्रमांक दिला जाईल आणि कार्ड मात्र, नंतर त्या व्यक्तीला मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रप्तिकर विभाग एक ऍप्लिकेशन विकसित करीत आहे. या ऍपमुळे तुम्हाला ऑनलाइन कर भरण्यासोबत अन्य सेवांही मिळणार आहेत. यात पॅनसाठी अर्ज करणे, तुमचा परतावा तपासणे आदी सेवा उपलब्ध असतील. सध्या प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर या सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहेत. मात्र, ऍप आल्यानंतर या सेवा मिळविणे नागरिकांसाठी सहजपणे उपलब्ध होणार आहेत. याचाच फायदा ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात होईल. या दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी "सीबीडीटी' अन्य यंत्रणांशी समन्वयाने करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.