टाटा-मिस्त्री वादाचे आता "आयआयएम'मध्ये धडे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

एका अध्यक्षाला फक्त स्ट्रॅटेजी बनवण्यावर भर द्यायला हवा की त्यासोबतच समूहाची ओळख निर्माण करण्यासाठीदेखील काम करायला हवे, यावर आयआयएम कोलकाताचे असोसिएट प्रोफेसर त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

नवी दिल्ली : एका बाजूला टाटा समूहाच्या संचालक मंडळात संघर्ष सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठित बिझेनस स्कूलमध्ये यातून काही तरी बोध घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. टाटा समूहात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीतून कॉर्पोरेट गव्हर्नन्स, आपत्ती व्यवस्थापन आणि उत्तराधिकार सारख्या विषयांमध्ये बरेचे काही शिकण्यासारखे आहे, असे या क्षेत्रातील प्राध्यापकांना वाटते आहे.

"सायरस मिस्त्रींना पदमुक्त करण्याचा विषय हा मालकी हक्क आणि व्यवस्थापकीय अधिकार यामध्ये येतो. एखादी व्यक्ती आपले सारे अधिकार पुढील व्यक्तीसाठी सोडून देते, असे शेअर बाजारात नोंद असलेल्या कोणत्याही संस्थेमध्ये क्वचितच घडते,' असे रामचंद्रन यांनी म्हटले आहे. रामचंद्रन आयआयएम बंगळूरमध्ये कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी हे विषय शिकवतात.

उद्योग ग्रुप आणि समूहातील फरक समजण्यासाठी होणार मदत

या प्रकरणामुळे बिजनेस ग्रुप आणि समूहातील फरक समजण्यास मदत होईल, असे रामचंद्रन यांना वाटते. टाटा सन्सच्या ग्रुप चेयरमनचे काम जनरल इलेक्‍ट्रिकच्या चेअरमनसारखे नाही. कारण जनरल इलेक्‍ट्रिक लीगल सिंगल एंटिटी आहे, ज्यामध्ये एरोस्पेस, मेडिकल आणि लायटिंगसारख्या विविध पोर्टफोलियोंचा व्यवसाय असतो. मात्र टाटा ग्रुप अनेक लीगल एंटिटींचा समूह आहे. ज्यामध्ये टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि टाटा केमिकल्सचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष पदावरून हटवता येऊ शकते, मात्र त्याला संचालक मंडळावरून हटवले जाऊ शकत नाही, हेदेखील आयआयएम बंगळूरमध्ये होणाऱ्या केस स्टडीमधून शिकवले जाणार आहे.

एका अध्यक्षाला फक्त स्ट्रॅटेजी बनवण्यावर भर द्यायला हवा की त्यासोबतच समूहाची ओळख निर्माण करण्यासाठीदेखील काम करायला हवे, यावर आयआयएम कोलकाताचे असोसिएट प्रोफेसर त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्ती त्यांच्यासाठी योग्य असलेल्या उमेदवाराचा शोध कसा घेतात, याचेदेखील मार्गदर्शन त्यांच्याकडून केले जाणार आहे.

या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचणे थोडे धाडसाचे ठरेल, असे रामचंद्रन यांनी म्हटले आहे. मात्र या सर्व प्रकरणातून कॉर्पोरेट गव्हर्नन्स, संचालकीय मंडळाचे काम, कुटुंबाव्यतिरिक्त प्रमुख कार्यकारी अधिकारी आणणे, उत्तराधिकाराचे व्यवस्थापन यांचे धडे दिले जाऊ शकतात, असे रामचंद्रन यांनी म्हटले आहे.

Web Title: IIM to have lessons from Ratan Tata-Cyrus Mistry drama