Income-Tax-Return
Income-Tax-Return

सहज भरा इन्कमटॅक्‍स रिटर्न

जून महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात इन्कम टॅक्‍स रिटर्न भरण्याचे! यंदाच्या वर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) जाहीर केलेले आयटीआर १ (सहज) हे विवरणपत्र विशेष दखल घेण्यासारखे आहे. पगारदार, निवृत्ती वेतनधारक व ज्येष्ठ नागरिक या वर्गात लोकप्रिय असणाऱ्या या विवरणपत्रात बदल केले गेले असून, त्याची काटेकोरपणे माहिती देणे आता बंधनकारक झाले आहे. या माहितीसह हे ऑनलाईन विवरणपत्र ‘सहज’पणे भरता येईल.

काय आहेत बदल?
पगाराचा ब्रेक-अप भरण्याची आता आवश्‍यकता आहे. कारण आतापर्यंत असा तपशील फक्त फॉर्म १६ मध्येच दिसत होता; तर विवरणपत्रात ही माहिती विशद करण्याची आवश्‍यकता नव्हती. आता पगार, निवृत्ती वेतन, करमुक्त नसणारे वेतन भत्ते, करपात्र सुविधा, वेतनेतर उत्पन्न व कलम १६ अंतर्गत मिळणाऱ्या वजावटी स्वतंत्ररीत्या भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरगुती मालमत्तेअंतर्गत मिळणाऱ्या उत्पन्नाचा ब्रेकअप पण आता भरण्याची आवश्‍यकता आहे, जो आधी आयटीआर २ आणि इतर फॉर्मसाठी अनिवार्य होता. घर भाड्याने दिले आहे, की स्वतःच रहात आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेला त्या वर्षाचा मालमत्ताकर, कर्जावरील व्याज व घराच्या उत्पन्नावर मिळणारी प्रमाणित वजावट विशद करून दाखवावी लागणार आहे. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी हे विवरणपत्र आता केवळ पगार, निवृत्ती वेतन, एका घराची मालकी असणाऱ्या, इतर मिळकतींमार्फत व्याजासह उत्पन्नाचा स्त्रोत असणाऱ्यांना; तसेच ५० लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असणाऱ्या निवासी व सामान्य निवासी असणाऱ्या व्यक्तीस भरता येईल. त्यामुळे ‘निवासी व सामान्य निवासी’ नसणारे व ‘अनिवासी’ व्यक्तींना हे विवरणपत्र गेल्या वर्षी भरता येत होते, ते यंदाच्या वर्षी भरता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. घरापासून उत्पन्नाऐवजी नुकसान होत असेल व ते पुढील वर्षासाठी ओढायचे असेल तर या विवरणपत्राचा वापर करता येणार नाही. परंतु २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे गृहकर्जाच्या व्याजामुळे होणारे संपूर्ण नुकसान इतर उत्पन्नातून वजा होऊ शकत असेल तर हे विवरणपत्र भरता येईल. थोडक्‍यात, घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्याने होणारे नुकसान म्हणजे ‘उणे उत्पन्न रक्कम’ या विवरणपत्रात दाखविता येईल, हे महत्त्वाचे! 

विशेष काळजी घेण्याची गरज
जर वरील माहिती दिली नाही तर हे विवरणपत्र सदोष प्राप्तिकर विवरण पत्र म्हणून १३९ (९) अंतर्गत घोषित होऊ शकते. म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ज्या करदात्यांचे शेतीपासून मिळणारे करमुक्त उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल किंवा करदात्याने लॉटरी वा घोड्यांच्या शर्यतीतून उत्पन्न मिळविले असेल किंवा भांडवली नफा किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळविले असेल किंवा परदेशात काही मालमत्ता असल्यास किंवा परदेशी करसवलत मिळणार असेल किंवा काही उत्पन्न परदेशातून आले असेल किंवा उर्वरीत स्त्रोतातून मिळणारे उणे उत्पन्न असेल तर हे विवरणपत्र भरता येणार नाही. या विवरणपत्रासोबत कोणतीही कागदपत्रे जोडावी लागणार नाहीत, ही याची खासीयत आहे. करमुक्त लाभांशाची रक्कम फक्त विषद करावयाची आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जे पगारदार व अन्य करदाते आयटीआर १ (सहज) भरण्यास पात्र नसतील, त्यांनी आयटीआर २ फॉर्म भरायचा आहे.

‘रिटर्न’ वेळेवर सादर नाही केले तर काय होते?
३१ जुलै २०१८ च्या आत विवरणपत्र भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर ते ३१ जुलै २०१८ नंतर; परंतु ३१ डिसेंबर २०१८ अगोदर भरल्यास काय होते, ते पाहू. याबाबतीत करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास पाच हजार रुपये विलंब शुल्क देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेच विवरणपत्र ३१ डिसेंबर २०१८ नंतर भरल्यास दहा हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. पण करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असल्यास व विवरणपत्र ३१ जुलै २०१८ नंतर, पण ३१ मार्च २०१९ पर्यंत भरल्यास कलम २३४ एफ अंतर्गत एक हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. अशी रक्कम विवरणपत्रात दाखविण्यासाठी वेगळा रकाना समाविष्ट करण्यात आला आहे. ३१ मार्च २०१९ नंतर असे विवरणपत्र दाखल करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त करदात्यास विलंबासाठी कलम २३४ ए, २३४बी आणि २३४सी अंतर्गत व्याजही द्यावे लागणार आहे. म्हणून वेळेवर विवरणपत्र सादर करणे हिताचे ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com