"अदानी यांच्या कर्जांची माहिती देता येत नाही'

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

अदानी समुहास देण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या कर्जांची माहिती तसेच ऑस्ट्रेलियामधील कोळशाच्या खाणींशी संबंधित असलेल्या कर्जाचा पुरावा बॅंकेकडून देण्यात यावा, अशी मागणी जोशी यांनी केली होती.

नवी दिल्ली - उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांना देण्यात आलेल्या कर्जांची माहिती "गोपनीय' असून उघड करता येणे शक्‍य नसल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे.

यासंदर्भात रमेश रणछोडदास जोशी यांनी भारतीय स्टेट बॅंकेकडून माहिती मागविली होती. अदानी समुहास देण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या कर्जांची माहिती तसेच ऑस्ट्रेलियामधील कोळशाच्या खाणींशी संबंधित असलेल्या कर्जाचा पुरावा बॅंकेकडून देण्यात यावा, अशी मागणी जोशी यांनी केली होती.
""यासंदर्भात मागविण्यात आलेली माहिती ही व्यावसायिक व गोपनीय स्वरुपाची असल्याने माहिती अधिकारांतर्गत उघड करता येणे शक्‍य नसल्याचे अर्जदारास कळविण्यात आले आहे,'' असे माहिती आयुक्त मंजुळा पराशर यांनी म्हटले आहे.

ही माहिती मागविण्यामागे जोशी यांचा कोणताही सार्वजनिक कल्याण हेतु (पब्लिक इंटरेस्ट) नसल्याचा दावाही बॅंकेच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्याकडून करण्यात आला होता. माहिती अधिकार कायद्यांतर्गत इतरवेळी प्रतिबंधित असलेली माहिती सार्वजनिक करण्यामधून जर समाजाचा फायदा होणार असेल; तर उघड करण्याची परवानगी आहे. जोशी यांच्या अर्जामधून असे काही दिसत नसल्याचे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, या कायद्यामधील तरतुदीनुसार ही माहिती नाकारण्यात आली आहे.