आयआयटीयन्सच्या नोकऱ्यांवर येणार 'संक्रांत'

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

आयआयटी प्लेसमेंट कमिटीचे संयोजक प्रोफेसर कौस्तुभ मोहंती यांनी सांगितले की, ''सध्या जागतिक पातळीवर मंदीचे सावट आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणार्‍या ऑफरची संख्या कमी झाली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनीदेखील नोकरीवर घेण्याचे प्रमाण कमी केले आहे. एच 1 बी व्हिसाबद्दल अमेरिकी सरकारने स्वीकारलेल्या धोरणामुळे प्लेसमेंटवरही परिणाम झाला आहे.''

मुंबई - नव्या वर्षात आयआयटीचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला नोकरीला मुकावे लागणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्याला मनाप्रमाणे किंवा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळणे कठीण होणार आहे. कारण एका अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील इंजिनिअरिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या आहेत. 

मानव संसाधन विकास मंत्रालयाने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2016-17 मध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी गेलेल्यांपैकी फक्त 66 टक्के पदवीधारकांना 'जॉब' मिळाला. तर 2015-16 मध्ये हेच प्रमाण 79 टक्के आणि 2014-15 मध्ये 78 टक्के होते. देशभरातील विविध ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात आयआयटीच्या निरनिराळ्या शाखांमधील 9,104 विद्यार्थ्यांपैकी केवळ 6013 विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. 

आयआयटी प्लेसमेंट कमिटीचे संयोजक प्रोफेसर कौस्तुभ मोहंती यांनी सांगितले की, ''सध्या जागतिक पातळीवर मंदीचे सावट आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणार्‍या ऑफरची संख्या कमी झाली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनीदेखील नोकरीवर घेण्याचे प्रमाण कमी केले आहे. एच 1 बी व्हिसाबद्दल अमेरिकी सरकारने स्वीकारलेल्या धोरणामुळे प्लेसमेंटवरही परिणाम झाला आहे.''

सध्या देशातील 23 आयआयटीमध्ये 75,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारतीय आयटी क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण आहे. आयटी कंपन्यांच्या तिमाही नफ्यात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. परिणामी अनेक आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात सुरु आहे. कॉग्निजंट, विप्रो आणि टेक महिंद्रासारख्या प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी संख्या कमी करण्याची घोषणा केली आहे.