बँकांच्या शेअरवर लक्ष ठेवा 

बँकांच्या शेअरवर लक्ष ठेवा 

शेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या काही दिवसात 1500 अंशांनी कोसळला. मात्र या सध्याच्या काळात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज (मंगळवार) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांची भेट घेत आहेत. या बैठकीत बॅंकांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत थकीत कर्जासोबतच बॅंकांच्या सद्य परिस्थितीबाबत आणि इतरही अनेक मुद्दयांवर चर्चा केली जाणार आहे. 

बँकांच्या शेअरवर लक्ष ठेवणे का गरजेचे?
नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेला विलीन केले आहे. त्यांनतर आणखी काही बॅंकांचे विलीनीकरण करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि आंध्र बॅंक या तीन बॅंकांची मिळून आणखी एक मोठी बँक होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत भरमसाट बुडीत कर्जांमुळे सार्वजनिक बॅंकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. बहुतांश बॅंका तोट्यात असून सरकारवर भांडवल मदतीचा दबाव वाढत आहे. गेल्या वर्षी सरकारने मुख्य स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केले. 

* शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून 

शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून विचार करावयाचा झाल्यास मात्र या दरम्यानच्या काळात बँकिंग क्षेत्राने बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छिणार्‍या नवीन गुंतवणूकदारांना बरीच संधी आहे.  केंद्र सरकारने गेल्या वर्षी सरकारने मुख्य स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केल्याबरोबर सहयोगी स्टेट बँकांच्या शेअरने सतत काही दिवस उच्चांकी पातळी गाठली. विलीनीकरणाची घोषणा झाल्यानंतर सहयोगी स्टेट बँकांचे शेअर काही कालावधीत दुपटीने वाढले. त्याचप्रमाणे आता बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेचे विलीनीकरण झाल्यानंतर देना बँकेच्या शेअरमध्ये वाढ नोंदवण्यात आली. दोन ते तीन दिवसात बँकेच्या शेअरने 4.70 टक्के परतावा दिला. 


सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक

बॅंक: देना बँक  

सध्याचा शेअरचा बाजारभाव(25 सप्टेंबर 2018 ): 16.65  रुपये       

विलीनीकरणाच्या दिवशी भाव : 19.05   रुपये 

विलीनीकरणाच्या आधीचा भाव: 15.70 रुपये                                            

आता आणखी काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरुवातीला पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि आंध्र बँकेचे विलीनीकरण होऊ शकते. त्यापाठोपाठ बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, इंडियन बँक, युनियन बँक, अलाहाबाद बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे देखील लवकरच विलीनीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या यातील बहुतांश बँकांचे शेअर 52 आठवड्यातील नीचांकी पातळीजवळ व्यवहार करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी होऊ शकते. म्हणजेच बँकांमध्ये केलेल्या 'एफडी'पेक्षा शेअर बाजारात बँकांच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास अधिक परतावा प्राप्त होण्याची शक्यता अधिक आहे. 

‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार यांचे सूचक वक्त्यव्य 

नुकत्याच झालेल्या बॅंक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणानंतर ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी एक सूचक  वक्त्यव्य  केले आहे. ते म्हणजे ‘आणखी बँकांना आमच्यामध्ये सामावून घेण्याची आमची क्षमता संपली आहे’. रजनीश कुमार यांच्या वक्त्यव्यावरून केंद्र सरकार आणखी बँकांचे काही विलीनीकरण करण्याच्या विचारात आहे.  

गेल्या वर्षी सहा बॅंकांना सामावून घेणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेला पूर्वपदावर येण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. नव्या बॅंकांना विलीन करण्याची बॅंकेची क्षमता संपली असल्याचे ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. नव्या बॅंकेला सामावून घेण्यासाठी एसबीआय योग्य उमेदवार नाही. विलीनीकरणाचे सुपरिणाम दिसण्यास किमान दोन ते तीन वर्षे लागतील, असे कुमार यांनी म्हटले आहे. विलीनीकरणातून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची संख्या कमी करून त्यामध्ये सुशासन आणणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बॅंक         चालू वर्षातील नीचांक      चालू वर्षातील उच्चांक    सध्याचा शेअरचा                                                                                    बाजारभाव (25 सप्टेंबर 2018)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया    रु.232.35                   रु.351.30              रु.263.55
पंजाब नॅशनल बॅंक       रु.64.30                      रु.231.45              रु. 64.85        
बॅंक ऑफ इंडिया           रु. 76.50                    रु.216.80              रु. 81.25
देना बॅंक                       रु.13.70                   रु. 32.00                रु.15.70
बॅंक ऑफ बडोदा            रु.104.70                   रु.206.65             रु.106.20  
कॅनरा बॅंक                   रु.209.30                   रु.463.70              रु.226.40
इंडियन बँक                 रु.241.90                  रु.427.40               रु.243.95
 युनियन बँक               रु.66.70                     रु.196.05             रु.69.70
 अलाहाबाद बँक           रु.35.75                     रु.89.00               रु.36.35

वरील आकडेवारीचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की, सध्या बँकांचे शेअर्स त्यांच्या वर्षभरातील नीचांकी पातळीजवळ आहे. 

सरलेल्या काळात बाँकिग क्षेत्राबाबत बुडीत कर्जाच्या प्रमाणात झालेल्या वाढीचा मुद्दा चर्चेत आहे. बँकांच्या बुडीत कर्जाच्या प्रमाणात झालेली वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे  बँकांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतविलेल्या शेअरधारकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील वाढत्या अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण वाढले आहे. मात्र वाढत्या प्रमाणाबाबत रिझव्‍‌र्ह बँक गंभीर त्याबद्दल विविध उपाययोजना योजल्या आहेत. असे असले तरी एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण ताबडतोबीने खाली घसरलेले निश्चितच दिसणार नाही. बँकांमधील ही अवस्था काही एका रात्रीत नाहीशी होणारी नाही. मात्र कौशल्य आणि नावीन्यतेच्या जोरावर या समस्येचे निराकरण करता येणे शक्य आहे.येत्या काळात त्यात लक्षणीय स्वरूपाची सुधारणा दिसण्याची शक्यता आहे. 


(लेखकाने त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com