‘एलआयसी’ची शेअर्समधून बक्कळ कमाई

LIC shares
LIC shares

एप्रिल ते डिसेंबरदरम्यान 16 हजार कोटींचा नफा कमावला

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होत बक्कळ कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत महामंडळाने शेअर्समधील (इक्विटी) गुंतवणुकीतून तब्बल 16 हजार कोटींची कमाई केली आहे.

एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात महामंडळाच्या प्रीमियम संकलनात 12.43 टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली असून, 1 लाख 45 हजार 31 कोटींचा प्रिमियम मिळवला. डिसेंबरअखेर महामंडळाच्या एकूण मालमत्तेने तब्बल 24 लाख कोटींचा टप्पा पार केला. एकूण महसुलातही 15.76 वृद्धी झाली असून 3 लाख 37 हजार 465 कोटी मिळाल्याचे महामंडळाने म्हटले आहे. महामंडळाचे यंदाचे हीरकमहोत्सवी वर्ष असून या वर्षात ग्राहकांना डिजिटल माध्यमातून थेट पॉलिसी देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे एलआयसीचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा यांनी सांगितले.

सध्या मोबाईल ऍप आणि वेबसाईवरील पॉलिसी वितरणाला चालना दिली जात आहे. देशभरातील जवळपास 20 लाख विमा एजंटला पीओएस मशिन्स दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शर्मा म्हणाले, की एलआयसीने लौकिकाप्रमाणे यंदाही कामगिरी केली, वर्षाचे उद्दिष्ट तीन महिनेआधीच पूर्ण केले आहे. नोटाबंदीचा फारसा परिणाम झाला नसल्याचे शर्मा यांनी सांगितले.

दीर्घकाळ गुंतवणुकीचे उद्दिष्ट
सर्वांत मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या एलआयसीची टाटासमूह, इन्फोसिस यांसारख्या बड्या कॉर्पोट्‌स तसेच ओएनजीसी, कोल इंडिया यांसारख्या बहुतांश नवरत्न कंपन्यांमध्ये अनेक वर्षांपासून गुंतवणूक आहे. केंद्रच्या निर्गुंतवणूक उपक्रमाला एलआयसीने भरघोस प्रतिसाद दिला आहे. एलआयसीने एप्रिल ते डिसेंबर या दरम्यान 39 हजार कोटी शेअर्समध्ये गुंतवले असून त्यातून 16 हजार कोटींचा नफा कमावला. मात्र एलआयसी हा ट्रेडर्स नसून दिर्घकाळ गुंतवणूकदार असल्याचे शर्मा यांनी या वेळी स्पष्ट केले.

"जीएसटी'चा विमा उत्पादनांवर किती परिणाम होईल, याचा अंदाज घेणे कठीण आहे, मात्र विमाधारकांचा विचार करून "एलआयसी'कडून प्रीमियम रेट्‌स वाढवले जाणार नाही. 
- व्ही. के. शर्मा, अध्यक्ष 
एलआयसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com