मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याची फेब्रुवारीपर्यंत मुदत 

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

फेब्रुवारी 2018 या कालावधीत मोबाईल सिम कार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बंद करण्यात येणार आहे. मोबाईल क्रमांकाच्या सुरक्षेसाठी नव्या नियमानुसार सर्व दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांची पडताळणी पुन्हा एकदा करणार आहेत. आधार कार्डशी लिंक करणाऱ्या ग्राहकांमध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांचाही यात समावेश असेल.

नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड, तसेच बॅंक खाते आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केल्यानंतर आता मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असून, फेब्रुवारी 2018 पर्यंत मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याची मुदत देण्यात आली आहे. 

फेब्रुवारी 2018 या कालावधीत मोबाईल सिम कार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बंद करण्यात येणार आहे. मोबाईल क्रमांकाच्या सुरक्षेसाठी नव्या नियमानुसार सर्व दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांची पडताळणी पुन्हा एकदा करणार आहेत. आधार कार्डशी लिंक करणाऱ्या ग्राहकांमध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांचाही यात समावेश असेल. यासाठी कंपन्यांनी ग्राहक सेवाच्या (कस्टमर केअर) माध्यमातून याबाबतची माहिती देण्यासही सुरवात केली आहे. 

दूरसंचार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील अनेक नागरिकांना सिम कार्ड कागदपत्रांची पडताळणी न करता देण्यात आली होती. अनेकदा सिम कार्ड बनावट ओळखपत्रांवर घेण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत; मात्र मोबाईल क्रमांक बॅंक खात्याशी जोडल्याने गैरप्रकार होण्याचाही धोका आहे. त्यामुळे सर्व मोबाईल क्रमांकांची पडताळणी व्हावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात "लोकनीती फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता.