चला, ‘ई फ्लॅट’ घेऊया...

चला, ‘ई फ्लॅट’ घेऊया...

आपण नियमित उत्पन्नासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतो. आपल्याकडे गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी पोस्ट वा बॅंकेतील एफडी किंवा एखादा फ्लॅट विकत घेऊन भाड्याने देणे हे दोन पर्याय खूप प्रचलित आहेत. पोस्ट किंवा बॅंकेच्या एफडीमध्ये आता परताव्याच्या दृष्टीने काही ‘अर्थ’ राहिलेला नाही, हे सर्वांना कळून चुकले आहे. पण ज्यांच्याकडे गुंतवणुकीची रक्कम जास्त आहे असे काही लोक एखादा फ्लॅट विकत घेऊन तो भाड्याने देऊन त्यातून नियमित उत्पन्न मिळवीत असतात. पण कधी विचार केलाय का या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा? आपण आज पाहूया की फ्लॅट विकत घेऊन भाड्याने देणे कितपत योग्य ठरते ते!

१) समजा एक वन बीएचके फ्लॅट विकत घ्यायचा म्हटले तरी किंमत साधारणपणे ५० लाख रुपये. ही रक्कम सर्वांकडेच असते असे नाही. ज्यांच्याकडे असेल, त्यांनी फ्लॅट घेतला आणि भाड्याने दिला तरी दरमहा १० ते १२ हजार भाडे मिळू शकते.

२) असे भाडे मिळण्यासाठी चांगला भाडेकरू शोधण्यासाठी होणारा त्रास वेगळाच. आधी ब्रोकरला भेटायचे, त्याची फी द्यायची, मग भाडेकरूकडून भाडे वसूल करण्यासाठीची तकतक.

३) १०-१२ हजार रुपये भाडे मिळाले तरी त्यातून मेंटेनन्सचा खर्च, पाणीपट्टी, घरपट्टी, सोसायटी चार्जेस हे खर्च मालकालाच करावे लागतात. म्हणजे हे सर्व खर्च झाल्यावर निव्वळ भाडे हातात राहते ते ७ हजार रुपये. म्हणजे ५० लाखांवर वर्षाला परतावा फक्त ८४ हजार रुपये. म्हणजेच फक्‍त २ टक्के!

४) फ्लॅट घेताना झालेली धावाधाव तर वेगळीच. पुढे सोसायटीमधील लोकांच्या आपल्या भाडेकरुसंदर्भात येणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो.

५) आता काही लोकांचे म्हणणे असते, की घेतलेल्या फ्लॅटची किंमत काही वर्षांनी वाढतेच ना! जर आपण बघितले तर आता गेल्या १५ ते २० वर्षांत जेवढ्या प्रमाणात घराच्या किमती वाढल्या, तशा आता वाढताना दिसत नाहीत.

६) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गुंतवणुकीतील तरलता अर्थात लिक्विडीटी. जर या गुंतवणुकीतून बाहेर पडायचे असेल तर ते सहज शक्‍य नसते. फ्लॅटच्या विक्रीसाठी जाहिरात द्यावी लागते, पुन्हा आपल्याला अपेक्षित असलेली किंमत देऊ शकणारा ग्राहक भेटला पाहिजे, या गोष्टी आल्याच. शिवाय प्रत्यक्ष व्यवहार व्हायला वेळ लागतो, तो वेगळाच! जेव्हा केव्हा या गुंतवणुकीतून बाहेर पडायची वेळ येते, त्यावेळेस मिळणाऱ्या फायद्यावर मोठा कर द्यावा लागतो.

मग पर्याय काय?
म्हणजे काय तर गुंतवणूक रक्कम, त्यातील तरलता, त्यातून मिळणार फायदा, त्यावर बसणारा कर आणि वरील होणारा सर्व त्रास या सर्व गोष्टी लक्षात घेता फ्लॅटमधील ‘गुंतवणूक’ सध्याच्या काळात फायदेशीर ठरत नाही, असे लक्षात येते. मग पर्याय काय? तर पर्याय आहे आणि तो म्हणजे हीच गुंतवणूक म्युच्युअल फंडातील बॅलन्स्ड फंडात करून त्यातून आपण नियमित उत्पन्न मिळवू शकतो. कसे ते पाहूया -

१) जर गुंतवणूक रक्कम ५० लाख आहे आणि ती जर आपण बॅलन्स्ड फंडात ठेवली तर आपल्याला नियमित उत्पन्न मिळू शकते. ते साधारणपणे ३३,३३३ रुपये दरमहा (दरवर्षी ८ टक्के या हिशेबाने) तेही जिवंत असेपर्यंत. ‘सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन’च्या (एसडब्ल्यूपी) माध्यमातून हे शक्‍य होऊ शकते.

२) महिन्याला मिळणाऱ्या परताव्यावर करही कमी भरावा लागतो.

३) आपण जर गेल्या ६ ते ७ वर्षांचा आढावा घेतला तर चांगला परतावा देणाऱ्या बॅलन्स्ड फंडांनी सरासरी ११ ते १२ टक्के परतावा दिला आहे. जर आपण ही गुंतवणूक पाच वर्षांसाठी केली असेल आणि जर या फंडाने सरासरी १२ टक्के जरी परतावा दिला तरी आपल्याला दर महिन्याला मिळणाऱ्या नियमित रकमेशिवाय पाच वर्षांनंतर केलेल्या गुंतवणुकीचे मूल्यांकन साधारण ६० ते ६१ लाख असायला हवे.

४) महत्त्वाचे म्हणजे या गुंतवणुकीत असणारी तरलता. ज्या दिवशी या गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जातो, त्या दिवसानंतर पुढील ४ दिवसांत बॅंकेत पैसे जमा होऊ शकतात.

थोडक्‍यात गुंतवणूक रक्कम, त्यातील तरलता, त्यातून मिळणार फायदा, त्यावर बसणारा कर या सर्व गोष्टी लक्षात घेता ही गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते. म्हणून मी याला म्युच्युअल फंडातील ‘ई फ्लॅट’ असे म्हणतो. तर वाचकहो, या गुंतवणुकीचा नक्की विचार करा आणि बदलत्या काळाप्रमाणे ‘ई फ्लॅट’मध्ये गुंतवणूक करा.

(डिस्क्‍लेमर - म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com