मोटारी महागल्या... उपकर आजपासून लागू

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मोटारींवरील GST

  • मध्यम आकाराच्या मोटारी : 45 टक्के
  • आलिशान मोटारी : 48 टक्के
  • SUV मोटारी : 50 टक्के

नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (GST) प्रणालीत मध्यम आकाराच्या मोटारी, आलिशान मोटारी आणि 'स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल' (SUV) यांच्यावरील उपकरात करण्यात आलेली वाढ आजपासून (ता. 11) लागू होणार आहे.

GST परिषदेच्या बैठकीत शनिवारी (ता. 9) मध्यम आकाराच्या मोटारींवरील उपकर 2 टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मोटारींवर आता एकूण 48 टक्के GST भरावा लागणार आहे. आलिशान मोटारींवर 5 टक्के उपकर आकारण्यात येणार असून, त्यावरील GST आता 48 टक्के झाला आहे. 'SUV'वरील उपकर 7 टक्के झाल्याने एकूण GST 50 टक्‍क्‍यांवर गेला आहे. केंद्रीय उत्पादनशुल्क आणि सीमा शुल्क मंडळाने नवे करदर उद्यापासून लागू होणार आहेत, असे म्हटले आहे.

काल झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोठी वाहने खरेदी करणाऱ्या वर्गाची आर्थिक क्षमता जास्त असल्याने अशा वाहनांवरील उपकर वाढविण्यात आल्याचे म्हटले होते. उपकर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविणे शक्‍य असताना तो सात टक्केच वाढवण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले होते. छोट्या पेट्रोल व डिझेल मोटारी, हायब्रीड मोटारी आणि तेरापेक्षा अधिक प्रवासीक्षमता असलेल्या वाहनांवरील उपकरात वाढ करण्यात आलेली नाही. GST 1 जुलैला लागू झाल्यानंतर मोटारींच्या किमती तीन लाख रुपयांपर्यंत कमी झाल्या होत्या. केंद्र व राज्याच्या आधीच्या एकत्रित करापेक्षा GST कमी असल्याने मोटारींच्या किमती कमी झाल्या होत्या. ही तफावत दूर करण्यासाठी GST परिषदेने उपकर वाढविला आहे.

आधीच्या करापेक्षा GST कमी
GST कररचनेत कराचा जास्तीत जास्त दर 28 टक्के आहे. यावर आणखी उपकर आकारता येत आहे. उपकर 15 ते 25 टक्के आकारण्यासाठी गेल्या आठवड्यात सरकारने अध्यादेश काढला आहे. GST परिषदेने काल अनेक वस्तूंवरील उपकर निश्‍चित केले. GSTआधी वाहनांवरील सर्वाधिक कर 52 ते 54.72 टक्के होता. GSTनंतर हा कर 43 टक्‍क्‍यांवर आला आहे. उपकर वाढविण्यात आल्याने आधीच्या तुलनेतील किमतीतील तफावत दूर झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास 

    Web Title: marathi business news GST cess hike car prices up