पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्र आशादायी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांमध्ये अनिवासी भारतीयदेखील (एनआरआय) सक्रिय झाले असून, जुलै 2016मधील 2500 ही संख्या आता जून 2017 मध्ये 4200 पर्यंत पोचली आहे. 

पुणे : गेल्या काही काळात पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात फारशी हालचाल झाली नसली, तरी घर घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्या गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत जून 2017 मध्ये वाढली आहे. त्यामुळे रिअल इस्टेटचे चित्र आशादायी आहे, असे मत मॅजिकब्रिक्‍स डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै यांनी व्यक्त केले. 

'मॅजिकब्रिक्‍स'च्या कन्झ्युमर सर्च ट्रेंड्‌स अहवालानुसार, घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांची पुण्यातील संख्या जुलै 2016 मध्ये 31,500 होती. ती यंदाच्या जूममध्ये 41,800 पर्यंत वाढली आहे. घराची मागणी वाढल्याचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. आता या मागणीचे रूपांतर प्रत्यक्ष घरखरेदीच्या व्यवहारांत करण्याचे आव्हान विकसकांसमोर असेल, असे श्री. पै म्हणाले. 

सर्वांत जास्त मागणी ही 80 लाख रुपयांपर्यंतच्या घरांसाठी दिसून आली आहे. या गटात घर घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या जुलै 2016 मधील 27,400 पासून जून 2017 मध्ये 37,400 पर्यंत वाढली आहे. 80 लाख ते 1.50 कोटी गटातील घरे घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या 6000 वरून 7000 पर्यंत वाढली आहे, तर प्रिमियम सेगमेंट म्हणजे 1.50 कोटी आणि पुढच्या किमतीतील घरे घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या 2900 वरून 3000 झाली आहे. याचा अर्थ 80 ते 85 टक्के मागणी ही 80 लाख रुपयांच्या आतील घरांसाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या गटातील घरे उपलब्ध करून दिल्यास त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळू शकेल, असे त्यांनी अहवालाच्या आधारे नमूद केले. 

घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांमध्ये अनिवासी भारतीयदेखील (एनआरआय) सक्रिय झाले असून, जुलै 2016मधील 2500 ही संख्या आता जून 2017 मध्ये 4200 पर्यंत पोचली आहे. 

पुण्यात अनोखे एक्‍स्पिरियन्स सेंटर
ग्राहकांच्या सोयीसाठी 'मॅजिकब्रिक्‍स'तर्फे चार शहरांत अनोखे एक्‍स्पिरियन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. पुण्यात सीझन्स मॉल येथे असे सेंटर पुढील महिन्यात सुरू केले जाणार आहे, असे सुधीर पै यांनी सांगितले. बरेचदा ग्राहकांना 8-10 विविध गृहप्रकल्प आवडतात. पण या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाणे शक्‍य नसते. एक्‍स्पिरियन्स सेंटरमध्ये मोठे डिस्प्ले, व्हर्च्युअल वॉक थ्रू व हॉलोग्राफिक प्रॉपर्टी शोकेसिंगद्वारे ग्राहकांची घराची निवडप्रक्रिया अधिक सुकर होईल. त्यातून ते 1-2 सर्वोत्कृष्ट जागा निवडून मग प्रत्यक्षात साईट व्हिजिटचा निर्णय घेऊ शकतील, असे ते म्हणाले.