निफ्टीने गाठली ऐतिहासिक पातळी; 9500 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

सेन्सेक्सने 30,590.71 अंशांची उच्चांकी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 62 अंशांची झेप घेत 9500 अंशांची ऐतिहासिक पातळी ओलांडली आहे. केंद्र सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्शभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असल्याचे शेअर दलालांनी सांगितले.

मुंबई - परदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी तेजीचे नवे शिखर सर केले. दुपारी 2.45 पर्यंत सेन्सेक्स 255 अंशांच्या वाढीसह 30 हजार 554 अंशांवर व्यवहार करत आहे.

सेन्सेक्सने 30,590.71 अंशांची उच्चांकी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 62 अंशांची झेप घेत 9500 अंशांची ऐतिहासिक पातळी ओलांडली आहे. केंद्र सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्शभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. वाहन उत्पादक कंपन्या, बँका, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्या, ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रात खरेदी दिसून आली.

याशिवाय महागाईचा दिलासा आणि कॉर्पोरेटचे समाधानकारक निकालांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची आगेकूच कायम राहिली. एप्रिलमध्ये घाऊक महागाई आणि किरकोळ महागाईचा दर कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून आगामी पतधोरणात व्याजदर कपात केली जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान चलन बाजारात रुपयाची दमदार कामगिरी सुरूच आहे. निर्यातदारांनी बाजारात डॉलरची विक्री केली. ज्याचा रुपयाला फायदा झाला. त्यामुळे रुपयाने देखील गेल्या 21 महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे.