माहिती हेच आता नव्या जगाचे इंधन: मुकेश अंबानी

वृत्तसंस्था
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

आजचा हा दिवस आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. भारतामधील मोबाईल उद्योगविश्‍व ज्या वेगाने विकसित झाले आहे; त्या वेगास जगात कोठेही तोड नाही. येत्या दहा वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था 2.5 लाख कोटी डॉलर्सवरुन 7 लाख कोटींपर्यंत वाढेल. एक उद्योगक्षेत्र म्हणून आपण तातडीने 1.3 अब्ज भारतीयांना या नव्या संधींचा लाभ घेण्यास सक्षम करावयास हवे

नवी दिल्ली - ""भारत जगातील पहिल्या तीन औद्योगिक क्रांतींमध्ये सहभागी होऊ शकला नाही. मात्र माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्‍टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे; आणि भारतही या क्रांतीमध्ये सहभागी होऊ लागला आहे. माहितीने जागतिक अर्थव्यवस्थेत आता "तेला'ची जागा घेतली आहे. भारताला माहितीची आयात करण्याची आवश्‍यकता नाही,'' असे प्रतिपादन रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज (बुधवार) केले.

दिल्लीमधील प्रगती मैदान येथे आज केंद्रीय दळणवळण (कम्युनिकेशन्स) मंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते पहिल्यावाहिल्या "भारतीय मोबाईल कॉंग्रेस' या अधिवेशनाचे उद्‌घाटन झाले. या पार्श्‍वभूमीवर अंबानी बोलत होते.

"आजचा हा दिवस आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. भारतामधील मोबाईल उद्योगविश्‍व ज्या वेगाने विकसित झाले आहे; त्या वेगास जगात कोठेही तोड नाही. येत्या दहा वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था 2.5 लाख कोटी डॉलर्सवरुन 7 लाख कोटींपर्यंत वाढेल. एक उद्योगक्षेत्र म्हणून आपण तातडीने 1.3 अब्ज भारतीयांना या नव्या संधींचा लाभ घेण्यास सक्षम करावयास हवे. याचबरोबर, प्रत्येक भारतीयास परवडेल असा स्मार्टफोन उपलब्ध करुन देणेही आवश्‍यक आहे. तरुण भारतीयांकडे अनेकानेक संकल्पना आहेत. आपण त्यांना योग्य संसाधने पुरविल्यास देशात लक्षावधी "स्टार्टअप्स' सुरु होऊ शकतात. येत्या 12 महिन्यांत देशातील 2 जी कव्हरेजपेक्षा 4 जी कव्हरेज जास्त असेल, असा माझा अंदाज आहे. आपल्या प्रिय पंतप्रधानांच्या अपेक्षा सत्यात उतरविण्यासाठी आपण बदल घडवावयास हवा. मात्र निव्वळ एखादी कंपनी वा सरकार ही योजना प्रत्यक्षात उतरवू शकत नाही. सगळ्यांनी एकत्र काम केल्यास आपण प्रत्येक भारतीयासाठी अधिक गुणवत्तापूर्ण आयुष्य निर्माण करु शकतो,'' असे अंबानी म्हणाले.