ज्येष्ठांसह सर्वांनाच दिलासा

ज्येष्ठांसह सर्वांनाच दिलासा

देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत. विशेषतः सेवानिवृत्त किंवा ज्येष्ठ नागरिकांना या योजनांचा सदैव आधार मिळत आलेला आहे. मात्र, कमी व्याजदरामुळे या योजनांच्या लोकप्रियतेला मध्यंतरी काहीशी ओहोटी लागल्याचे दिसून येत होते. या योजनांच्या व्याजदरापेक्षा अधिक परतावा मिळणारे गुंतवणुकीचे नवे पर्याय पुढे येऊ लागल्याने गुंतवणूकदारांचा कल बदलताना दिसत होता. परंतु, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १ ऑक्‍टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर बऱ्यापैकी (०.३० ते ०.४० टक्के) वाढविल्याने ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. जवळजवळ तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला हा दिलासा सध्याच्या परिस्थितीत महत्त्वाचा ठरणारा आहे.

अगदी तीन महिन्यांपूर्वीपर्यंत व्याजदराच्या चक्राचे आवर्तन दक्षिणेच्या दिशेने सुरू होते. पण रिझर्व्ह बॅंकेने गेल्या दोन पतधोरण आढाव्यात रेपो रेट वाढविल्याने बॅंकांनी आपल्या ठेवींचे व्याजदर लगेच वाढवायला सुरवात केली. या आघाडीवर अल्पबचत योजना काहीशा पिछाडीवर राहिल्या होत्या. पण बाजारातील व्याजदर वाढल्याची बाब लक्षात घेऊन सरकारने स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. 

‘पीपीएफ’च्या लोकप्रियतेचे मर्म
अल्पबचत योजनांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), मुदत ठेव (टीडी), आवर्ती ठेव (आरडी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश होतो. या सर्व योजना प्रामुख्याने टपाल (पोस्ट) खात्याच्या माध्यमातून राबविल्या जातात. निवडक बॅंकांमध्येही काही योजना राबविल्या जातात. यापैकी पीपीएफ, एनएससी, पाच वर्षीय टीडी, एससीएसएस आणि सुकन्या समृद्धी या योजनांमधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत करसवलतही मिळत असल्याने त्यांचे महत्त्व आणि आकर्षण अधिक प्रमाणात वाढते. अशा करसवलतीबरोबरच करमुक्त व्याज देणारी पीपीएफ ही योजना तर कामधेनूच ठरणारी आहे. त्याचमुळे घराघरांत आणि मनामनात ती आजही लोकप्रियता टिकवून आहे. ‘बाजारात काहीही नवे येवो, आम्ही ‘पीपीएफ’ची कास सोडणार नाही, दरवर्षी त्यात शक्‍य तितकी रक्कम गुंतवणारच,’ असा पक्का निर्धार केलेला मोठा वर्ग समाजात दिसून येतो. ‘पीपीएफ’च्या लोकप्रियतेचे मर्म यातच लपलेले आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर नव्या तिमाहीत म्हणजे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात ८ टक्के (करमुक्त) व्याज दिले जाणार आहे. या योजनेचे व्याज वर्षातून एकदा म्हणजे ३१ मार्चला दिले जात असले, तरी त्या-त्या महिन्यातील व्याजदरानुसार ते मोजले जाते. त्यामुळे नव्या तिमाहीतील वाढीव व्याजदराचा फायदा सर्वांच्याच सर्व गुंतवणुकीला होणार आहे. समजा, जानेवारी ते मार्च २०१९ या तिमाहीसाठी सरकारने व्याजदर आणखी वाढले तर त्याचा आणखी लाभ मिळू शकतो. ‘पीपीएफ’च्या खात्यात महिन्याच्या १ ते ५ तारखेदरम्यान भरल्या जाणाऱ्या रकमेवर त्या महिन्यापासून व्याज मिळते, त्यामुळे शक्‍य असल्यास महिन्याच्या पाच तारखेच्या आत पैसे भरणे फायद्याचे ठरते. याचप्रमाणे, दहा वर्षांच्या आतील मुलींच्या भविष्यासाठी सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी या योजनेचे व्याजदेखील वार्षिक तत्वावर मोजले जात असले तरी दर तिमाहीसाठी जाहीर केलेले त्या-त्या वेळचे व्याजदर त्यासाठी गृहीत धरले जातात. या योजनेला नव्या तिमाहीसाठी ८.५ टक्के व्याजदर जाहीर केला गेला आहे.

‘एनएससी’धारकांना ‘अच्छे दिन’
करसवलत आणि सुरक्षिततेसाठी अजूनही ‘एनएससी’वर प्रेम करणाऱ्यांनाही आता ८ टक्के व्याजदरामुळे ‘अच्छे दिन’ येणार आहेत. तसेच, दामदुपटीचे आकर्षक वाटणाऱ्यांच्या चेहऱ्यावर किसान विकास पत्रातील गुंतवणूक आता ११२ महिन्यांतच हास्य फुलविणार आहे.  

ज्येष्ठांच्या हाती अधिक व्याज
जोखीम घेण्याची इच्छा नसलेल्या आणि व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची गरज लक्षात घेऊन सुरू केलेल्या ‘एससीएसएस’ योजनेचा व्याजदर ८.३ टक्‍क्‍यांवरून ८.७ टक्के करण्यात आला आहे. एक ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीदरम्यान या योजनेत पैसे गुंतविणाऱ्यांना योजनेच्या मुदतपूर्तीपर्यंत नव्या, वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे. पाच वर्षांच्या या योजनेत दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते. ज्यांना दरमहा उत्पन्नाची गरज भासते, त्यांच्यासाठी ‘एमआयएस’च्या रूपाने ७.३ ऐवजी ७.७ टक्‍क्‍यांचा दिलासा मुदतपूर्तीपर्यंत मिळणार आहेच. एकूणच, यापुढे ज्येष्ठांच्या हाती काहीसा अधिक पैसा येऊ शकणार आहे.

महागाईवर मात करण्यासाठी....
अल्पबचत योजनांचे नवे व्याजदर हे महागाई (चलनवाढ) दरावर मात करीत नसले तरी सुरक्षिततेच्या निकषांवर ते सरस ठरतात. अर्थात, थोडी जोखीम घेऊन दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांना म्युच्युअल फंडातील बॅलन्स्ड फंडासारखा पर्याय लाभदायक ठरू शकतो. या फंडात एकरकमी पैसे दीर्घ कालावधीसाठी गुंतवून ‘सिस्टेमॅटीक विथड्रॉवल प्लॅन’चा (एसडब्ल्यूपी) अवलंब करीत नियमित उत्पन्न मिळविणारे अनेकजण आहेत. दीर्घकाळात महागाई दरापेक्षा अधिक परतावा मिळवून देण्याची क्षमता यात असते. केवळ ‘जोखीम’ या शब्दाने घाबरून जाऊन या पर्यायापासून पूर्णपणे दूर राहणे हिताचे ठरणारे नसते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com