नीरव मोदींकडून 'पीएनबी'त 11 हजार कोटींचा गैरव्यवहार?

Punjab National Bank
Punjab National Bank

मुंबई : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बॅंकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेतील मुंबईतील काही शाखांमध्ये 11 हजार 360 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. नियमानुसार ही बाब बॅंकेने राष्ट्रीय शेअर बाजार, तसेच मुंबई शेअर बाजाराला कळवल्यानंतर बुधवारी (ता. 14) बॅंकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. त्याचे पडसाद शेअर बाजारातही उमटून पंजाब नॅशनल बॅंकेच्या समभागासह शेअर बाजाराच्या निर्देशांकांत घसरण झाली. 

विख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याने बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या साह्याने हा गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. त्यात काही बड्या सराफांचे लागेबांधे असून, त्यात आणखी काही बॅंकांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे. "पीएनबी'च्या तक्रारीनुसार "सीबीआय'ने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. 

परदेशातील देणी चुकती करण्याच्या उद्देशाने काही सराफ व्यावसायिकांनी नियमबाह्यपणे दक्षिण मुंबईतील "पीएनबी'च्या ब्रॅंडी हाउस येथील मिड कॉर्पोरेट ब्रॅंचमधील काही खातेधारकांच्या नावावर चुकीच्या पद्धतीने अल्प मुदतीची कर्जे घेतली आहेत. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी मोदी आणि गीतांजली जेम्स यांना बनावट हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) दिली. 2011 पासून हा प्रकार सुरू असल्याचे तपासात उघड झाले. 25 जानेवारीला परतफेडीचा हप्ता चुकल्यानंतर हा गैरव्यवहार बॅंकेच्या निदर्शनात आला. त्यानंतर 280 कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत बॅंकेचे उपमहाव्यवस्थापक अवनिश नेपालिया यांनी 29 जानेवारीला सीबीआयकडे तक्रार केली होती. बॅंकेने केलेल्या सखोल तपासात हा गैरव्यवहार 11 हजार कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले. बॅंकेच्या तक्रारीनुसार सीबीआयने नीरव मोदी, निशाल मोदी, अमी मोदी, मेहुल चोक्‍सी, बॅंकेचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, एसडब्ल्यूओ मनोज खरात तसेच एक अनोळखी व्यक्ती अशा सात जणांवर गुन्हा नोंदवला. या प्रकरणी "पीएनबी'ने 10 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 

मोदीच्या कंपनीसाठी "एलओयू' 
पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेले बॅंकेचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी 31 मे 2017 ला पंजाब नॅशनल बॅंकेच्या फॉरेन एक्‍स्चेंज विभागात, तर खरात आयात विभागात कार्यरत होते. त्यांच्या मदतीने आरोपींनी एलओयू मिळवल्याचा आरोप आहे. मोदीच्या डायमंड कंपनीला फायदा होण्याच्या दृष्टीने हा सर्व प्रकार करण्यात आला आहे, असा आरोप आहे. 

बॅंकेने कोणत्याही कंपनीला विशिष्ट रकमेचा एलओयू देण्यासाठी तेवढीच रक्कम कंपनीने बॅंकेत जमा करणे आवश्‍यक असते; पण तशी कोणतीही रक्कम न घेता मोदी व त्याच्या भागीदांरांच्या कंपनीला एलओयू देण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे. अशा पद्धतीने आरोपींना तीन एलओयू देण्यात आले. त्यामुळे सामान्य खातेधारकांच्या 280.70 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे बॅंकेच्या प्राथमिक तपासणीत आढळले. परदेशातून सामग्री आयात करणाऱ्यांना असे एलओयू देण्यात येते. तेवढीच रक्कम त्या आयातदार कंपनीने बॅंकेत भरणे जरूरी असते, त्यामुळे आयातदार कंपनीने देणी न चुकवल्यास बॅंक ती रक्कम संबंधितांना देते; मात्र येथे रक्कम न भरताच या कंपनीला बॅंक अधिकाऱ्यांनी एलओयू दिले. त्यानुसार सीबीआयने या प्रकरणी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्‍ट कलम 13(2) व 13(1)(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला. त्यानंतर मुंबईतील एका शाखेत 1.77 अब्ज डॉलरचा गैरव्यवहार झाल्याचे बॅंकेने बुधवारी शेअर बाजाराला कळवले. याबाबत सीबीआय व इतर तपास यंत्रणांनाही बॅंकेकडून कळवण्यात आले आहे. या प्रकरणी तपासानंतर संबंधित प्रकरणाचे 280 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात विलीनीकरण करायचे की नवा गुन्हा दाखल करायचा, याबाबत सीबीआय पडताळणी करत आहे. 

दरम्यान, या नव्या प्रकरणातील आरोपींबाबतची माहिती बीएसईला देण्यात आलेली नाही. पंजाब नॅशनल बॅंकेकडे सध्या 4.5 कोटींच्या कर्जासह 36 हजार 566 कोटींचे भांडवल आहे. मोदीच्या दिल्ली, सूरत व जयपूर येथील कार्यालयांमध्ये आयकर खातत्याने जानेवारीअखेरीस शोधमोहीम राबवली होती. 

बॅंकेचे भागभांडवल ः 36 हजार 566 कोटी रु. 
गैरव्यवहाराची व्याप्ती ः 11 हजार 360 कोटी रु. 
सीबीआयने नोंदवलेला गैरप्रकार ः 280 कोटी रु. 


बाजारात घसरण 
शेअर बाजारातील घसरण : 144.52 अंश 
बॅंकेच्या शेअरची घसरण ः बीएसई 15.85 रु. (9.81 टक्के) व एनएसइ 16.80 रु. (10.39 टक्के) 

अन्य कोण सुपात? 
- सार्वजनिक क्षेत्रातील दोन बॅंका 
- एक खासगी बॅंक 

कोण आहे नीरव मोदी? 
जगातील अनेक सेलिब्रिटींना रत्ने, आभूषणे पुरवणारा बडा व्यापारी. 
- फोर्ब्सने 2016 मध्ये जाहीर केलेल्या श्रीमंत तरुण व्यक्तींच्या यादीत नाव 
संपत्तीचे मूल्य (नेटवर्थ) ः 1.74 अब्ज डॉलर 
फायर स्टार डायमंड कंपनीची संपत्ती ः 2.3 अब्ज डॉलर 
नीरव मोदीच्या व्यवसायाच्या शाखा - मुंबई, दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, लास व्हेगास, हवाई, सिंगापूर, बीजिंग, मकाव 

कसा झाला गैरव्यवहार? 
मेसर्स डायमंड्‌स आर यूएस, मेसर्स सोलार एक्‍सपोर्ट, मेसर्स स्टेलर डायमंड्‌स या कंपन्यांनी परदेशातील देणी चुकती करण्यासाठी जानेवारीमध्ये "पीएनबी'ला "बायर्स क्रेडिट'साठी विनंती केली. आयातदारांच्या बॅंकांनी दिलेल्या "लेटर ऑफ कम्फर्ट'च्या आधारावर आयातदारांना अर्थपुरवठा केला जातो. या गैरव्यवहारात "पीएनबी'च्या दोन अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे आठ हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) इश्‍यू केली. अलाहाबाद बॅंकेच्या हॉंगकॉंगमधील शाखेसाठी पाच हमीपत्रे आणि ऍक्‍सिस बॅंकेच्या हॉंगकॉंग शाखेसाठी तीन हमीपत्रे इश्‍यू करण्यात आली. नीरव मोदी, निशाल मोदी, ऍमी मोदी आणि मेहुल चोक्‍सी हे या कंपन्यांचे भागीदार आहेत. 

सराफ उद्योग रडारवर 
पंजाब नॅशनल बॅंकेने 11 हजार 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे जाहीर केल्यानंतर देशातील सराफ उद्योग तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. या गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार असलेल्या नीरव मोदी, गीतांजली, गिन्नी आणि नक्षत्र या ज्वेलर्स कंपन्यांची आणि बॅंक व्यवहारांची "सीबीआय' आणि सक्‍तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याप्रकरणी सराफ उद्योगावर ईडी आणि प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. कर चुकवेगिरीसंदर्भातील सराफ उद्योगावर तपास यंत्रणांनी ठपका ठेवला होता. 

केंद्र सरकारला झटका; गुंतवणूकदार पोळले 
याच वर्षी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बॅंक असलेल्या "पीएनबी'ला तब्बल 5 हजार 473 कोटींची भांडवली मदत केली होती; मात्र 11 हजार कोटींचा घोटाळा उघड झाल्यामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. बॅंकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या सरकारच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. शेअर बाजारात "पीएनबी'चा शेअर 10 टक्‍क्‍यांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांना 3 हजार 900 कोटी गमवावे लागले आहेत. त्यामुळे बॅंकेच्या तिमाही कामगिरीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

ईडीकडूनही गुन्हा दाखल 
पंजाब नॅशनल बॅंकेतील 280 कोटींच्या अपहारप्रकरणी सीबीआयने गुन्हा नोंदवल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) नीरव मोदी आणि इतरांविरोधात मनी लॉण्डरिंगचा गुन्हा नोंदवला आहे. हा अपहार करताना मनी लॉण्डरिंग झाले का, याचा तपास ईडीचे अधिकारी करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com