तेल उत्पादनात कपात कायम 

पीटीआय
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

'ओपेक' आणि अन्य तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनात लक्षणीय कपात केली असली तरी ही कपात पुढे कायम ठेवावी लागणार आहे. ही कपात पुढे कायम ठेवण्यावर सर्वांनी सहमती दर्शवायला हवी. 
- इसाम अल-मरझूक, पेट्रोलियम मंत्री, कुवेत

अबुधाबी : तेल उत्पादनात कपात करण्यासाठी मंजूर केलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीच्या पुढेही तेल उत्पादक देशांना बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी तेलाच्या उत्पादनात कपात करावी लागेल, असे सूतोवाच सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री खलिद अल-फलिह यांनी गुरुवारी केले. 

फलिह म्हणाले, ''बाजारपेठेत स्थिरता आणण्यासाठी तेल उत्पादनातील कपात पुढे चालू ठेवावी लागणार आहे. तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक' आणि अन्य तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन दररोज 18 लाख बॅरलने कमी करण्याचा करार केला आहे. गेल्या महिन्यात कुवेतमध्ये झालेल्या चर्चेत ही कपात पुढे कायम ठेवावी लागेल, असे मत मांडण्यात आले. व्हिएन्नामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.'' 

'ओपेक'च्या सदस्य देशांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये तेलाचे उत्पादन पहिल्या सहा महिन्यांसाठी दररोज 12 लाख डॉलरने कमी करण्याचा करार केला होता. यात नंतर 'ओपेक'बाहेरील रशियानेही डिसेंबरमध्ये सहभाग घेऊन तेलाचे उत्पादन 5 लाख 58 हजार बॅरलने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 2014 च्या मध्यापासून निम्म्याने कमी झाले असून, ते सध्या प्रतिबॅरल 50 डॉलरच्या आसपास आहेत.