रामदेव बाबांच्या पतंजलीची उलाढाल दहा हजार कोटींवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

सध्या देशभरात पतंजलीचे तब्बल 6 हजार वितरक असून त्याची संख्या 12 हजारापर्यंत नेण्याचे पतंजलीने उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षात कंपनीने देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी होण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. हरिद्वारप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्ये एक प्रकल्प सुरू करण्याची योजना बाबांनी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली - योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीने एफएमसीजी क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांच्या उरात धडकी भरवली आहे. कारण सरलेल्या वर्षात पतंजलीची उलाढाल 10 हजार 561 कोटींवर पोचली आहे. पतंजली आयुर्वेदचे संस्थापक रामदेव बाबा व बाळकृष्ण यांनी गुरुवारी हरिद्वार येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
पतंजलीची चालू वर्षात उलाढाल 20 हजार कोटींवर पोचण्याची आश त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्यावर्षी पतंजलीच्या विविध उत्पादनांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात कोलगेट, नेस्ले यांसारख्या परकी कंपन्यांना भारतीय बाजारात संकटांचा सामना करावा लागला; परंतु 2012 मध्ये खुल्या बाजारपेठेत दाखल झालेल्या "पतंजली आयुर्वेद लिमिटेड'ने चार वर्षांत मोठी उलाढाल करत प्रगतीचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे. 2011-12 या वर्षात 446 कोटी रुपये असलेली उलाढाल असलेली कंपनी 2016-17 या वर्षात 10000 कोटी रुपयांवर नेऊन कंपनीने नवीन मापदंड तयार केला. विशेषतः नोव्हेंबर 2015मध्ये जाहिरात मोहीम सुरू केल्यावर त्याचा कंपनीला मोठा फायदा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या "मेक इन इंडिया' धोरणाचे हे एक उत्तम उदाहरण बनले आहे. याशिवाय स्वदेशीचा नारा देत पतंजली आयुर्वेद देशभरातील लाखो कुटुंबांच्या घरात आणि मनात पोचली आहे. कोणतेही अतिरंजित दावे अथवा ब्रॅंड ऍम्बेसिडरचा वापर न करता; तसेच संपूर्णतः संशोधन व तथ्यांवर आधारित जाहिरातींमुळे कंपनीची कामगिरी मार्केटिंग क्षेत्रातील विकासाचे वेगळे उदाहरण बनली आहे.

सध्या देशभरात पतंजलीचे तब्बल 6 हजार वितरक असून त्याची संख्या 12 हजारापर्यंत नेण्याचे पतंजलीने उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षात कंपनीने देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी होण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. हरिद्वारप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्ये एक प्रकल्प सुरू करण्याची योजना बाबांनी जाहीर केली आहे.

गेल्या वर्षात पतंजलीने विविध प्रकारची उत्पादने बाजारात आणली आहेत. पतंजलीने सातत्यपूर्ण संशोधन व विकास, कंत्राटी उत्पादनाचा विस्तार आणि दर्जा राखण्यासाठी सतत प्रयत्न केला आहे. शिवाय संशोधनावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. शिवाय पतंजलीने त्यांच्या उत्पादनांची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेने अतिशय कमी आणि स्पर्धात्मक ठेवल्या आहेत.
(अर्थ विषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा www.sakalmoney.com)

Web Title: Patanjali to grow revenues by 100% to Rs 20,000 cr in FY18, plans 12,000 distribution network