एअर इंडियाचे खासगीकरण नाही 

पीटीआय
शनिवार, 18 मार्च 2017

"उदय' योजनेमुळे तमिळनाडूतील वीज कंपन्यांचा तोटा एका वर्षात 60 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. पुढील वर्षात त्या नफा नोंदविण्याची शक्‍यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता वीज सुधारणा सुरू करण्यात येणार आहेत. 
- पीयूष गोयल, केंद्रीय ऊर्जामंत्री 

मुंबई : तोट्यातील सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याचे आक्रमक धोरण सरकारने आखले आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी दिली. प्रत्येक मोठ्या देशाकडे सरकारी विमान कंपनीची गरज असल्याचे सांगून त्यांनी एअर इंडियाच्या खासगीकरणाची शक्‍यता मात्र फेटाळून लावली. 

येथे आज एका कार्यक्रमात गोयल म्हणाले, "तोट्यातील सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याचे आक्रमक धोरण सरकारने आखले आहे. यात हिंदुस्तान फोटो फिल्म्स ही पहिली सरकारी कंपनी असेल. याबाबत कामगार संघटना आणि भागधारकांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काही प्रमाणात प्रगती झालेली आहे.'' पुण्यातील औषध कंपनीची निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍सचे नाव न घेता त्यांनी सांगितले. 

एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर गोयल म्हणाले, ""प्रत्येक मोठ्या देशाला सरकारी विमान कंपनीची गरज असते. एअर इंडियाची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. गेल्या वर्षी एअर इंडियाने नफा नोंदविला होता. आता वित्तीय पुनर्रचना आणि मार्गांची प्रभावी रचना करण्याची आवश्‍यकता आहे.'' सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे 72 हजार 500 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत यश मिळल्याने आर्थिक सुधारणांना आणखी वेग येण्याची शक्‍यता आहे.'' 
 

Web Title: Piyush Goyal rules out privatization of Air India