...'तोपर्यंत' ATM राहणार बंद; 'रॅन्समवेअर'चा धोका

...'तोपर्यंत' ATM राहणार बंद; 'रॅन्समवेअर'चा धोका

मुंबई : रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना तत्काळ आपली एटीएम यंत्रणा अपडेट करण्याचे आदेश दिले असून, अपडेट पूर्ण होत नाही तोपर्यंत एटीएम सेवा सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत. जगभरातील अनेक संगणकावर सायबर हल्ला करणाऱ्या रॅन्समवेअर मालवेअरपासून बचाव करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे दिवसातील काही तास एटीएम केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.

'रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आपल्या एटीएम यंत्रांमधील विंडोज् ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. अपडेट पुर्ण झाल्याशिवाय एटीएम पुन्हा सुरु करु नयेत असेही सांगण्यात आले आहे,' अशी माहिती बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

बँकांना एटीएम केंद्रावरील यंत्रांसाठी कंपन्यांकडून सेवा पुरविली जाते. बँकांनी या कंपन्यांना सिस्टीम अपडेट करण्यास सांगितले आहे. या अपडेटसाठी दिवसातील काही तास एटीएम केंद्रे बंद ठेवली जातील. गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवड्यामुळे अनेक एटीएम केंद्रे बंद आहेत. परंतु यामुळे ग्राहकाच्या माहिती किंवा पैशांना कसलाही धोका नसल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

मायक्रोसॉफ्ट विंडोजचे जुने व्हर्जन असलेल्या यंत्रणांमध्ये हा मालवेअर ई-मेलच्या माध्यमातून पसरतो. यामुळे अनेक यंत्रणांमधील डेटा लॉक होऊन कामकाज ठप्प झाले आहे. डेटा अनलॉक करण्यासाठी तीनशे डॉलरची खंडणीही डिजिटल करन्सीच्या स्वरूपात मागण्यात आली आहे. याचा फटका रुग्णालये, बॅंका, कंपन्या यांना मोठ्या प्रमाणात बसला असून, मालवेअर पसरलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे; मात्र ब्रिटनमधील या संशोधकाने याबाबत माहिती कळताच मालवेअरचे विश्‍लेषण करण्यास सुरवात केली. या विश्‍लेषणाबाबत ट्‌विटरवर माहिती अपडेट करत असतानाच अमेरिकेतीलही काही संशोधक याबाबत विश्‍लेषण करत होते. त्या सर्वांनी चर्चा करताना ब्रिटनमधील 'मालवेअरटेक'ला याबाबतचा 'किल स्वीच' म्हणजेच रोखण्याचा मार्ग अचानक सापडला आहे.

मालवेअरकडून वापरात असलेले डोमेन रजिस्टर केल्यास त्याचा प्रसार रोखता येतो, हे त्याच्या लक्षात आले. रजिस्टर नसलेल्याच डोमेनला मालवेअरकडून लक्ष्य केले जात असल्याने डोमेन रजिस्टर करणे हा रोखण्याचा मार्ग म्हणजेच किल स्वीच असल्याचे 'मालवेअरटेक'ने ट्‌विटरवर म्हटले आहे. या किल स्वीचमुळे मालवेअर रोखण्याचा मार्ग मिळाला असला, तरी आधीच ज्या यंत्रणांमध्ये मालवेअर आला आहे, त्यावर उपाय मिळालेला नाही.

दोन दिवसांपुर्वी आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कम्प्युटर हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. भारतातील सर्व एटीएम यंत्रे 'विंडोज एक्सपी' ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. यामुळे अनेक एटीएम यंत्रांवर सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. मायक्रोसॉफ्टने काही वर्षांपुर्वीच 'विंडोज एक्सपी'शी निगडीत सुविधा देणं बंद केलं आहे. परंतु कंपनीने आता भारतासह इतर देशांमध्ये विंडोजसाठी अपडेट रिलीज केल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com