सुवर्ण बचत खात्यावरील व्याज तात्काळ द्या

पीटीआय
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सोने आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुवर्ण बचत योजनेतील खात्यांवर तात्काळ व्याज जमा करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने बॅंकाना दिले आहेत.

रिझर्व्ह बॅंकेचे बॅंकांना आदेश

मुंबई: सोने आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुवर्ण बचत योजनेतील खात्यांवर तात्काळ व्याज जमा करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने बॅंकाना दिले आहेत. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अंतर्गत नागरिकांनी सोने बचत खात्यांमध्ये जमा केले होते. मात्र या खात्यांमध्ये बॅंकांनी विहीत मुदतीत व्याज जमा केले नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर आरबीआयने बॅंकांना आदेश दिले आहेत.

दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सुवर्ण बचत योजना सुरू केली. पाच ते सात वर्षांपासून 15 वर्षांपर्यंत सोने बचत खात्यांमध्ये जमा करता येते. यासाठी अल्प कालावधीसाठी 2.25 टक्‍के आणि दिर्घ मुदतीसाठी 2.50 टक्के व्याजदर आहे. मात्र बहुतांश बॅंकांनी या बचत खात्यांवरील व्याज अदा केलेले नाही. याची दखल घेत आरबीआयने बॅंकांना व्याजाची रक्‍कम जमा करण्याचा आदेश दिला आहे. व्याज जमा केल्यानंतर बॅंकांनी परताव्याची मागणी सरकारकडे करावी. शिवाय यापुढे व्याजाची रक्कम नियमित खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश बॅंकांना दिले आहेत. सुवर्ण बचत खाते हातळणीसाठी बॅंकांना दीड टक्का कमिशन दिले जाते.