वाचा येत्या 1 जुलैपासून काय काय होणार स्वस्त?

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

एकूण 66 वस्तूंवरील "जीएसटी'त कपात; करमणूक करातही दिलासा

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवाकरांतर्गत (जीएसटी) सरकारने आज 66 वस्तूंवरील कर कमी केला आहे. यात ट्रॅक्‍टर, संगणक प्रिंटर, इन्सुलिन, काजू, दप्तरे, गृहोपयोगी वस्तूंचा समावेश असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त रंगपेट्या, चित्रकलेच्या वह्यांवरील कर पूर्णतः संपुष्टात आणला आहे. तर चित्रपटांच्या 100 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवरील कर देखील घटविण्यात आला आहे.

एकूण 66 वस्तूंवरील "जीएसटी'त कपात; करमणूक करातही दिलासा

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवाकरांतर्गत (जीएसटी) सरकारने आज 66 वस्तूंवरील कर कमी केला आहे. यात ट्रॅक्‍टर, संगणक प्रिंटर, इन्सुलिन, काजू, दप्तरे, गृहोपयोगी वस्तूंचा समावेश असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त रंगपेट्या, चित्रकलेच्या वह्यांवरील कर पूर्णतः संपुष्टात आणला आहे. तर चित्रपटांच्या 100 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवरील कर देखील घटविण्यात आला आहे.

तब्बल 133 वस्तूंच्या कराचा फेरआढावा घेण्यासाठी जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक आज झाली. त्यापैकी 66 वस्तूंवरील कर कमी करण्यात आल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जीएसटीअंतर्गत झालेल्या या करकपातीच्या निर्णयाचा फायदा 75 लाख रुपये वार्षिक उलाढाल असलेले लहान व्यापारी, उद्योजक, हॉटेलमालकांना मिळेल. याआधी वार्षिक उलाढालीची मर्याचा 50 लाख रुपये होती. जीएसटी परिषदेची पुढील बैठक येत्या रविवारी (ता. 18) होणार असून, त्यात ई-बिल, लॉटरी यावरील करांबाबत चर्चा अपेक्षित आहे. सरकार एक जुलैपासून जीएसटी लागू करण्यासाठी वेगाने काम करत असल्याचेही जेटली या वेळी म्हणाले.

अर्थमंत्र्यांनी सांगितले, की चित्रपटाच्या तिकिटांचा दर शंभर रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यावरील कर घटविण्यात आला असून, सुधारित दर 18 टक्के असेल. मात्र 100 रुपयांपेक्षा अधिक तिकीटदर असल्यास पूर्वीप्रमाणेच 28 टक्के करआकारणी केली जाईल. इन्सुलिनवरील कर 12 टक्‍क्‍यांवरून कमी करून 5 टक्के करण्यात आला आहे. तर शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांवरील करदेखील 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्के कमी करण्यात आला आहे. तर रंगपेट्या, चित्रकलेच्या वह्यांवरील 12 टक्के कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. मात्र सॅनेटरी नॅपकिन्सवरील कर पूर्वीप्रमाणेच असेल.

ट्रॅक्‍टर, संगणकाचे सुटे भाग यावरील कर कमी करण्यात आले आहे. यातील ट्रॅक्‍टरच्या सुट्या भागांचा 28 टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्‍क्‍यांच्या टप्प्यात समावेश केला आहे. संगणकाचे प्रिंटरदेखील 18 टक्‍क्‍यांच्या श्रेणीमध्ये आणले आहेत.

काजूवरील कर 18 टक्‍क्‍यांवरून 12 टक्‍क्‍यांवर आणण्याचा निर्णय आज झाल्याचे जेटली यांनी सांगितले. अर्थात, टेलिकॉम उद्योगाची करकपातीची मागणी मात्र परिषदेने मान्य केली नसल्याचेही आज स्पष्ट झाले. टेलिकॉम उद्योगावरील 18 टक्के कर कायम राहील.

जीएसटीचे नवे दर
सिनेमा तिकीट (शंभर रुपयांपेक्षा अधिक) : 28 टक्के
सिनेमा तिकीट (शंभर रुपयांपेक्षा कमी), शालेय दप्तरे, काजळ, ट्रॅक्‍टरचे सुटे भाग, प्रिंटर, प्लॅस्टिक मणी, कॉंक्रीट पाइप, प्लॅस्टिक टर्पोलिन : 18 टक्के
लोणचे, चटण्या, मुरांबा, मोहरी सॉस, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थ, कटलरी : 12 टक्के
इन्सुलिन, अगरबत्ती, डेंटल वॅक्‍स, काजू : 5 टक्के
चित्रकला वह्या, रंगपेट्या : 0 टक्के