रिलायन्स कम्युनिकेशन्स मनुष्यबळ कपात करणार?

Reliance Communications
Reliance Communications

नवी दिल्ली: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियोमुळे दूरसंचार क्षेत्रात सध्या मोठे आव्हान उभे राहीले आहे. दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांनी एकमेकांशी भागीदारी आणि विलीनीकरणाची भूमिका घेतली आहे. एकत्रीकरणामुळे दूरसंचार कंपन्यांकडे मनुष्यबळ अतिरिक्त होऊ लागले आहे. त्यामुळे बर्‍याच कंपन्यांच्या बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सदेखील मनुष्यबळ कपात करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. परिणामी आज (सोमवार) रिलायन्स कम्युनिकेशन्सचा शेअर इंट्राडे व्यवहारात 4.11 टक्क्यांनी घसरला आहे. 8 मार्चनंतर प्रथमच शेअर इतका घसरला आहे. शेअरने इंट्राडे व्यवहारात 37.60 रुपयांची नीचांकी पातळी गाठली आहे.

कंपनी सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. एअरसेल आणि एमटीएससोबत कंपनी विलीन केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांची गरज राहणार नसल्याने बोलले जात आहे.

येत्या सहा ते बारा महिन्यांच्या कालावधीत दूरसंचार क्षेत्रातील भरपूर नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियोमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठे आव्हान निर्माण झाल्याने या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सध्या अटीतटीची स्पर्धा निर्माण झाली आहे. जियोशी स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपन्या एकत्र आल्या आहेत. यामुळे कंपन्यांच्या ग्राहकसंख्येत वाढ होईल. तसेच मनुष्यबळापोटी होणारा खर्च आणि एकुण भांडवली खर्च कमी करण्यास मदत होईल. परंतु याचा रोजगारांवरदेखील परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

"सध्या कंपन्यांचा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण 40 ते 43 टक्के आहे. व्होडाफोन आणि आयडियासारख्या दोन मोठ्या कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे या खर्चावर दबाव निर्माण होऊ शकतो. अशावेळी कंपन्यांसमोर नोकऱ्या रद्द करण्याचा किंवा नोकऱ्यांच्या रचनेत फेरबदल करण्याचा पर्याय उरतो.

दूरसंचार कंपन्यांकडून होणाऱ्या थेट नियुक्तीचे प्रमाण कमी आहे. मात्र, कस्टमर केअर आणि नेटवर्क मॅनेजमेंटसारख्या गोष्टींच्या माध्यमातून या क्षेत्रामार्फत अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतात. बहुतांश सेल्स, डिस्ट्रीब्यूशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस विभागातील नोकऱ्यांवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com