रिलायन्स 'जिओ'ला 22.50 कोटींचा तोटा

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

कंपनीने आगमनापासूनच दोन भव्य सवलत योजना सादर केल्या. याअंतर्गत कंपनीने ग्राहकांना मोफत डेटा आणि कॉलिंग सुविधा दिल्या. त्यानंतर, कंपनीने मोफत सेवा बंद करीत ग्राहकांना प्राइम सदस्यत्व देऊ केले.

नवी दिल्ली - कोट्यवधी ग्राहकांना आधी मोफत आणि आता सवलतीच्या दरात इंटरनेट डेटा आणि कॉलिंग सेवा देण्याचा 'रिलायन्स जिओ'ला मोठा फटका बसला आहे.

एकापाठोपाठ दोन सवलत योजना जाहीर करणाऱ्या कंपनीला ऑक्टोबर ते मार्चदरम्यान काहीच उत्पन्न मिळालेले नाही. याऊलट, कंपनीला ऑक्टोबर ते मार्चदरम्यान 22.50 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. अगोदरच्या वर्षातील याच काळात कंपनीला 7.5 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्षात सेवा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑक्टोबर 2016 ते मार्च 2017 दरम्यान कंपनीला काहीच कार्यान्वयन उत्पन्न मिळाले नसून, इतर उत्पन्न 2.23 कोटी रुपयांवरुन 50 लाख रुपयांवर पोचले आहे. कंपनीच्या इतर उत्पन्नात 77.8 टक्क्यांची घसरण झाली आहे. रिलायन्स जिओची शेअर बाजारात नोंदणी झालेली नाही. यामुळे कंपनीला आर्थिक निकाल जाहीर करणे बंधनकारक नाही.

कंपनीने आगमनापासूनच दोन भव्य सवलत योजना सादर केल्या. याअंतर्गत कंपनीने ग्राहकांना मोफत डेटा आणि कॉलिंग सुविधा दिल्या. त्यानंतर, कंपनीने मोफत सेवा बंद करीत ग्राहकांना प्राइम सदस्यत्व देऊ केले.

इतर अर्थविषयक घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा: www.sakalmoney.com