सलग चौथ्या महिन्यात 'जिओ'च सुपरफास्ट

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

"ट्राय'तर्फे देशभरातील ग्राहकांच्या माध्यमातून मोबाईल डेटा स्पीडविषयीची माहिती संकलित करून मायस्पीड ऍपच्या मदतीने तिची तुलना केली जाते.

नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात सुरु झालेल्या शीतयुद्धात रिलायन्स जिओने सलग चौथ्या महिन्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या नव्या अहवालानुसार, रिलायन्स 'जिओ'ने एप्रिल महिन्यातदेखील प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेगवान सेवा देऊ केली आहे. या काळात कंपनीच्या इंटरनेटवरुन डाऊनलोड स्पीड तब्बल 19.12 मेगाबाईट प्रति सेकंद(एमबीपीएस) होता.

टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियातर्फे (ट्राय) जाहीर झालेल्या सरासरी मासिक मोबाईल ब्रॉडबॅंड स्पीडविषयक माहितीनुसार, एप्रिल महिन्यात जिओने 19.12 एमबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा उपलब्ध करुन दिली. कंपनीने मार्चच्या तुलनेत अधिक वेगवान स्पीड नोंदवला असून यादरम्यान हा वेग 18.48 एमबीपीएस होता. दरम्यान, प्रतिस्पर्धी कंपनी आयडिया सेल्युलरचा वेग 13.70 एमबीपीएस तर व्होडाफोन इंडियाचा 13.38 एमबीपीएस होता. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचा वेग 10.15 एमबीपीएस होता.

"ट्राय'तर्फे देशभरातील ग्राहकांच्या माध्यमातून मोबाईल डेटा स्पीडविषयीची माहिती संकलित करून मायस्पीड ऍपच्या मदतीने तिची तुलना केली जाते.