डिजिटल क्षेत्रात रिलायन्सची '4जी' क्रांती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

  • ग्राहकांना रात्री डेटा फ्री मिळणार 
  • अवघ्या 50 रुपयांमध्ये मिळणार एक जीबी डेटा 
  • विद्यार्थ्यांना 25 टक्के अतिरिक्त डेटा 
  • डिसेंबरपर्यंत व्हॉईस कॉलिंग फ्री
  • सध्याच्या दरांपेक्षा एक दशमांश दर 

मुंबई - रिलायन्स कंपनीने आज (गुरुवार) आपली बहुप्रतिक्षित ‘जियो 4 जी‘सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध करुन दिली. मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही सेवा लॉन्च केली. 

 

डिजिटल विश्वातील स्पर्धा तीव्र करणाऱ्या जियोनो ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक सुविधा सादर केल्या आहेत. कंपनी सध्या 4G सेवेची चाचणी करत असल्याने रिलायन्स LYF ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा दिली जाणार आहे. ग्राहकांचे सिमकार्ड सुरु झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही सवलत आहे.

अंबानी म्हणाले की, जिओ भारताला आणि 120 भारतीयांना समर्पित करत आहे. प्रत्येक भारतीयांच्या हाती डेटाची ताकद देणार आहोत. ‘जिओ डिजीटल लाईफ‘ हा नव्या युगाचा मंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या "डिजिटल इंडिया"च्या स्वप्नातील प्रकल्प आहे. नव्या डिजिटल युगात जो मागे राहील तो संपेल. आपल्याकडे जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहे. त्यांना सूप, बिस्किट्स (खायला) द्या, त्यांच्या हाती डिजिटल डेटाची ताकद द्या. तसे वातावरण द्या मग बघा भारत कसा बदलतो आणि हे तरुण कसे जगाला लीड करतात. ऑक्सिजनशिवाय जगता येणार नाही, डेटा हा डिजिटल युगाचा ऑक्सिजन आहे. ती गरज जिओ पूर्ण करेल. डिजिटल क्रांतीने शिक्षण, आरोग्य, कृषी, बँकिंग अशी सारी क्षेत्रे बदलणारी आहेत. ती अधिक जनताभिमुख, पारदर्शी, सर्वव्यापी आणि जलद होतील.