जिओच्या एंट्रीनंतर रिलायन्सची कोटीच्या कोटी उड्डाणे

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

आज कंपनीच्या शेअरने इंट्रा डे व्यवहारात 1380 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे.

मुंबई : रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या बाजारातील प्रवेशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरुच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओवर पैसे आकरण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारभांडवलात सहा आठवड्यांच्या कालावधीत तब्बल रु.1 लाख कोटींची भर पडली आहे.

सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल सुमारे 4.44 लाख कोटी आहे. ते गेल्या महिन्यात 15 फेब्रुवारीरोजी 3.41 लाख कोटी रुपये होते. आज कंपनीच्या शेअरने इंट्रा डे व्यवहारात 1380 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्सचा शेअर 1370.95 रुपयांवर व्यवहार करत असून तो 51.75 रुपयांनी म्हणजे 3.92 टक्क्यांनी वधारला आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 925.70 रुपयांची नीचांकी तर 1380 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल रु.444,636.19 कोटींवर पोचले आहे.