नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेचे 'जैसे थे' धोरण

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.25 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर तर बॅंक रेट 6.75 टक्के कायम ठेवला आहे. नोटाबंदी निर्णयानंतर हे रिझर्व्ह बॅंकेचे दुसरे पतधोरण आहे.

मुंबई - नोटाबंदीनंतर लागू झालेल्या नियमांची मर्यादा शिथिल झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आज (बुधवार) आपले पतधोरण जाहीर करताना कोणत्याही दरात बदल न करता 'जैसे थे'चे धोरण अवलंबिले. 

रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.25 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर तर बॅंक रेट 6.75 टक्के कायम ठेवला आहे. नोटाबंदी निर्णयानंतर हे रिझर्व्ह बॅंकेचे दुसरे पतधोरण आहे.

महागाईत घट, रुपयातील स्थैर्य आणि केंद्राच्या अर्थसंकल्पातील वित्तीय व्यवस्थापनासंबंधी घोषणांमुळे यंदा रिझर्व्ह बँकेकडून दर कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, यावेळी पतधोरण निश्चित करणाऱ्या समितीने एकमताने रेपो दर 6.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

यंदाच्या आर्थिक वर्षातील हे सहावे द्वैमासिक पतधोरण आहे. राजन यांच्या काळात शेवटची रेपो दर कपात एप्रिलच्या पतधोरणात झाली. या आर्थिक वर्षांत एप्रिल महिन्यात पाव टक्क्य़ांची कपात केल्यानंतर जून, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमधील पतधोरणांत रेपो दर कपात करण्यात आली नव्हती.