धोका की मौका?

risk or chance to invest in stock market
risk or chance to invest in stock market

शेअर बाजारात या आठवड्यात थोडेफार चढ-उतार झाले असले तरी हा बाजार सध्या उच्चांकी पातळीवर आहे. अशी उच्चांकी पातळी गाठली गेली की सर्वसामान्यांमध्ये या बाजाराविषयी आकर्षण वाढू लागते. अशावेळी या बाजारात अनेक गुंतवणूकदार हे नवीन गुंतवणूक करावी की नाही या विवंचनेत दिसतात. परंतु, बाजाराची वाटचाल ही कायम अनिश्‍चित असते. बाजार खाली येण्याची वाट पाहू आणि मग गुंतवणूक करू, असे म्हणणारे बाजारात पैसे गुंतवू शकलेले नाहीत व दुसरीकडे बाजारानेही नवनवे उच्चांक प्रस्थापित करणे थांबविलेले नाही. त्यामुळे बाजाराचा अंदाज लावण्यात वेळ घालवू नये, हेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.

आगामी काळात बाजारात 'करेक्‍शन' अथवा नफेखोरी नक्कीच होऊ शकते, परंतु अशावेळीसुद्धा अनेक कंपन्यांचे शेअर हे गुंतवणुकीची संधी देत असतात. गुंतवणूकदारांनी अशा शेअरवर लक्ष ठेवायला हवे. आम्ही वेळोवेळी असे शेअर आपल्यासमोर मांडत आलो आहोत. अशा बाजारात ट्रेडर्स मंडळींनी नक्कीच सावधगिरी बाळगायला हवी, कारण त्यांचा दृष्टिकोन हा अल्प कालावधीचा असतो. तसेच बाजारातील अनेक तथाकथित दिग्गज मंदीची वाट बघत आहेत. पण अशी वाट बघण्यात ही मंडळी "बाजारातील तेजी' आधीच गमावून बसलेली आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.

यापुढे गुंतवणूक कशी करावी?
शेअर बाजारात आपले पूर्ण भांडवल (गुंतवणुकीची रक्कम) न लावता 30-40 टक्के भांडवल हे अशा बाजारात नफेखोरी झाल्यास गुंतवणुकीसाठी तयार ठेवावे. बाकी ज्या ज्या कंपन्यांचे "फंडामेंटल्स' चांगले आहेत व ज्यांच्या भावात अजूनही वाढ संभवते, अशा शेअरमध्ये 3-4 वर्षांचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करण्यास हरकत नाही.
शेअर बाजारात जर नफेखोरी अथवा "करेक्‍शन' आले तर ते तीव्र स्वरूपाचे असेल, त्यामुळे वेळोवेळी नफा काढून घेणे इष्ट ठरेल.

आम्ही याआधी सुचविलेल्या काही शेअरबद्दल सांगायचे झाले, तर पुढील चित्र समोर येते.
1) कल्याणी स्टील: सध्याचा भाव : रु. 428, सुचविलेला भाव : रु. 275, मिळणारा परतावा : 55 टक्के. हा परतावा केवळ पाच महिन्यांमध्ये दिसून येत असून, नफा आवर्जून काढून घ्यावा.
2) मिर्झा इंटरनॅशनल: सध्याचा भाव : रु. 149, सुचविलेला भाव : रु. 102, मिळणारा परतावा : 46 टक्के. हा परतावा 12 महिन्यांमध्ये दिसून येत असून, नफा आवर्जून काढून घ्यावा.
3) लक्‍स इंडस्ट्रीज: सध्याचा भाव : रु. 1015, सुचविलेला भाव : रु. 583, मिळणारा परतावा : 74 टक्के. हा परतावा 15 महिन्यांमध्ये दिसून येत असून, नफा आवर्जून काढून -घ्यावा.

श्रीनिवास जाखोटिया 
रितेश मुथियान
(डिस्क्‍लेमर: लेखकद्वय "इक्विबुल्स'चे संचालक आहेत व त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी "सकाळ' सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com