'सॅमसंग'कडून अत्याधुनिक क्‍यू एलईडी टीव्ही 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

सॅमसंगचा हा क्‍यू एलईडी टीव्ही तीन लाख 14 हजार 900 रुपयांपासून 24 लाख 99 हजार, 900 रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. 

नवी दिल्ली - सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने नवा अत्याधुनिक क्‍यू एलईडी टीव्ही भारतीय बाजारपेठेत सादर करीत दूरचित्रवाणी पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध केला आहे. हा टीव्ही क्‍यू 7, क्‍यू 8 आणि क्‍यू 9 अशा तीन श्रेणींमध्ये व 55 इंच, 65 इंच, 75 इंच, 88 इंच अशा आकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. 

"सॅमसंग'ने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली असून, आजपासून ते 21 मेपर्यंत प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्‍सी एस8+(गोल्ड) मोफत मिळणार आहे. क्‍यू एलईडी टीव्ही दूरचित्रवाणी क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणेल, असे सॅमसंग दक्षिणपूर्व आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. हॉंग यांनी या वेळी सांगितले. 

"सॅमसंग'ने "द फ्रेम' नावाचे खास वैशिष्ट्य सादर केले आहे, असे सांगून कंपनीचे उपाध्यक्ष राजीव भुतानी म्हणाले, की याअंतर्गत युझर्स टीव्हीचा वापर भिंतीवरील फ्रेमप्रमाणे वापर करू शकतात. या फ्रेममध्ये तुम्हाला दहा श्रेणींमधील शेकडो प्रकारची चित्रं तुमच्या बैठकीच्या खोलीतील भिंतीवर सजवता येतील. नवीन डिस्प्ले तंत्रज्ञानासह हे टीव्ही "नो-गॅप वॉल माउंटिंग'मुळे सहजपणे भिंतीला टेकवून उभे केले जाऊ शकतात. याशिवाय ग्राहकांना ग्रॅव्हिटी स्टॅंड आणि स्टुडिओ स्टॅंड उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय टीव्हीला एकच केबल असणार आहे. ही केबल टीव्हीला सॅमसंग वन कनेक्‍ट बॉक्‍सशी जोडली जाईल आणि टीव्ही सुरू होईल. 

सॅमसंगचा हा क्‍यू एलईडी टीव्ही तीन लाख 14 हजार 900 रुपयांपासून 24 लाख 99 हजार, 900 रुपयांपर्यंत उपलब्ध असेल.