सेन्सेक्‍समधील घसरगुंडी सुरूच 

पीटीआय
बुधवार, 19 एप्रिल 2017

अमेरिकेने "एच-1बी' व्हिसावर आणलेले निर्बंध आणि ऑस्ट्रेलियाने विदेशी कामगारांना देण्यात येणारा व्हिसा रद्द केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसला.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये मंगळवारी सलग चौथ्या सत्रात नफेखोरीमुळे घसरण झाली. सेन्सेक्‍स 94 अंशांची घसरण होऊन 29 हजार 319 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 34 अंश म्हणजेच 0.37 टक्‍क्‍यांनी घसरण होऊन 9 हजार 105 अंशांवर बंद झाला. 

शेअर बाजारात आज सकाळी सकारात्मक वातावरण होते. त्यामुळे सेन्सेक्‍स सकाळी 267 अंशांनी वधारला होता. तो 29 हजार 701 या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मुदतपूर्व निवडणुकांची केलेली घोषणा आणि उत्तर कोरियामुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण याचा परिणाम शेअर बाजारावर झाला.

यामुळे नफेखोरी सुरू होऊन सेन्सेक्‍समध्ये घसरण झाली. निर्देशांक 94 अंश म्हणजेच 0.32 टक्के घसरण होऊन 29 हजार 319 अंशांवर बंद झाला. मागील चार सत्रांत निर्देशांकात 469 अंश म्हणजेच 1.58 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 34 अंश म्हणजेच 0.37 टक्‍क्‍यांनी घसरण होऊन 9 हजार 105 अंशांवर बंद झाला. 

व्हिसा निर्बंधांचा परिणाम 
अमेरिकेने "एच-1बी' व्हिसावर आणलेले निर्बंध आणि ऑस्ट्रेलियाने विदेशी कामगारांना देण्यात येणारा व्हिसा रद्द केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसला. मात्र, भारतीय हवामान खात्याने समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज वर्तविल्याने शेअर बाजारातील पडझड रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली.