सेन्सेक्‍समध्ये २१५ अंशांची घसरण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.४) जोरदार विक्री केली. यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्‍स २१५.३७ अंशांनी घसरून ३५ हजार ११ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.७० अंशांची घट झाली आणि तो १० हजार ६२८ अंशांवर बंद झाला.

बाजारात ग्राहकोपयोगी वस्तू, बॅंकिंग, भांडवली वस्तू उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सची विक्री झाली. सकाळच्या सत्रात जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर सेन्सेक्‍सने दमदार सुरूवात केली होती, मात्र त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाबाबत अंदाज व्यक्त होऊ लागल्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी बाजारात २०२ कोटींची विक्री केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र ३३७ कोटींची खरेदी केली.

एचडीएफसी बॅंकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. अदानी पोर्ट, भारती एअरटेल, ओएनजीसी, एसबीआय, एशियन पेंट्‌स, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअर्स घसरणीसह बंद झाले. 

डॉ. रेड्डीज लॅब, इन्फोसिस, टाटा स्टील, रिलायन्स, टीसीएस आदी शेअर वधारले. रियल्टी, पॉवर, टेलिकॉम, बॅंकेक्‍स, इन्फ्रा आदी निर्देशांकात घसरण झाली.

सोने-चांदी महागले
सराफांकडून मागणी वाढल्याने सराफा बाजारात सोने-चांदीच्या भावात सोमवारी तेजी दिसून आली. मुंबईत सोने प्रतिदहा ग्रॅमला १०० रुपयांनी वधारून ३० हजार ७४५ रुपयांवर बंद झाले. चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे १५५ रुपयांची वाढ झाली आणि चांदीचा भाव ३९ हजार ४१० रुपयांवर स्थिरावला. दिल्लीत सोने प्रतिदहा ग्रॅमला ५० रुपयांनी वधारून ३१ हजार ६५० रुपयांवर बंद झाले. चांदीच्या भावात ५० रुपयांची घसरण झाली.

Web Title: sensex decrease