जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला 

जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला 

मुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131.52 अंशांच्या वाढीसह 34 हजार 865 अंशांवर बंद झाला. निफ्टीने 40 अंशांची कमाई केली आणि तो 10 हजार 512 अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी शेअर्सला मागणी होती. 

चलनवाढ, औद्योगिक उत्पादनाच्या निराशाजनक कामगिरीकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करीत खरेदी केली. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढीचा दर 5.13 टक्‍क्‍यांपर्यंत गेला. ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादनाने मात्र तीन महिन्यांतील सुमार कामगिरी केली. औद्योगिक उत्पादन निर्देशांक 4.3 टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहिला. मात्र, या आकडेवारीचा फारसा परिणाम शेअर गुंतवणूकदारांवर झाला नाही. त्यांनी खरेदीचा सपाटा सुरूच ठेवला. आधीच्या सत्रात सेन्सेक्‍सने 792 अंशांची झेप घेतली होती. या सत्रात स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1 हजार 287 कोटींचे शेअर खरेदी केले. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र 1 हजार 322 कोटींची विक्री केली. 

इन्फोसिस, आयटीसी, ओएनजीसी, टीसीएस, सन फार्मा, एचडीएफसी बॅंक, विप्रो, रिलायन्स, टाटा मोटर्स, भारती एअरटेल आदी शेअर तेजीसह बंद झाले. 

हेल्थकेअर इंडेक्‍समध्ये सर्वाधिक 2.22 टक्‍क्‍यांची वाढ झाली. त्याखालोखाल आयटी इंडेक्‍स, टेक इंडेक्‍स वधारले. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. इन्फोसिस, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बॅंक, वेदांता, ऍक्‍सिस बॅंक, एल अँड टी, मारुती सुझुकी, एशियन पेंट्‌स, कोल इंडिया, अदानी पोर्ट या शेअर विक्रीचा फटका बसला. 

आशियातील इतर शेअर बाजारांवर मात्र जागतिक घडामोडींचा दबाव दिसून आला. जागतिक बाजारात कच्च्या तेलातील महागाईने उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची आर्थिक घडी विस्कटणार आहे. परिणामी, या बाजारपेठांमधून बडे संस्थात्मक गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत. आजच्या सत्रात जपान निक्केई, हॉंगकॉंग हॅंगसेंग, तैवान, कोरिया आदी शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com