शेअर बाजारात तेजीचे वातावरण 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

बाजार भांडवलात रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल 
गुंतवणूकदारांच्या खरेदीने दिवसअखेर रिलायन्सचा समभाग 1.2 टक्‍क्‍याने वधारला. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल 4,60,519 कोटींपर्यंत वाढून रिलायन्स शेअर बाजारात सर्वाधिक बाजार भांडवल असलेली अव्वल कंपनी ठरली आहे. या श्रेणीत रिलायन्सने "टीसीएस'ला मागे टाकले.

मुंबई - फ्रान्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात युरोपीय युनियनचे खंदे पुरस्कर्ते इमान्युएल मॅक्रोन यांनी आघाडी घेतल्याने युरोपसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये सोमवारी (ता.24) तेजीची लाट आली. गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने सेन्सेक्‍समध्ये 291 अंशांची वाढ होऊन 29,655.84 अंशांवर बंद झाला. निफ्टीही 99 अंशांनी वधारून 9217.95 वर बंद झाला. 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता. बाजारात बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, भांडवली वस्तू उत्पादक, बॅंक, तेल आणि वायू, धातू आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी होती. शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी (ता. 21) 1 हजार 132 कोटींची खरेदी केली. रिलायन्स इंडस्ट्रीजशिवाय एचडीएफसी बॅंक, एसीसी, गेल, ऍक्‍सिस बॅंक, एलअँडटी, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट आदी शेअर्समध्ये वाढ झाली. मीडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही बऱ्यापैकी खरेदी झाली. जपान, हॉंगकॉंग यांच्यासह युरोपातील पॅरिस, फ्रॅंकफर्ट, लंडन आदी शेअर बाजार तेजीसह व्यवहार करत होते. 

बाजार भांडवलात रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल 
गुंतवणूकदारांच्या खरेदीने दिवसअखेर रिलायन्सचा समभाग 1.2 टक्‍क्‍याने वधारला. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल 4,60,519 कोटींपर्यंत वाढून रिलायन्स शेअर बाजारात सर्वाधिक बाजार भांडवल असलेली अव्वल कंपनी ठरली आहे. या श्रेणीत रिलायन्सने "टीसीएस'ला मागे टाकले. "टीसीएस'चे बाजार भांडवल 4,58,932 कोटी आहे. याआधी 13 फेब्रुवारी 2013ला "टीसीएस'ने रिलायन्सच्या बाजार भांडवलात मागे टाकले होते. 2017 मध्ये आतापर्यंत रिलायन्सच्या समभागांमध्ये 31 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, याचकाळात वायदे बाजारात 11 टक्‍क्‍यांची वृद्धी झाली. "टीसीएस'मध्ये मात्र 1.4 टक्‍क्‍यांची घसरण झाली.