पैशाच्या गोष्टी: शेअर बाजाराला पुन्हा ‘अच्छे दिन’

पैशाच्या गोष्टी: शेअर बाजाराला पुन्हा ‘अच्छे दिन’

तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2014 च्या आधी शेअर बाजार हा अतिशय अस्थिर परिस्थितीतून जात होता. परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून बाजारात मोठी आशा निर्माण झाली. त्यानंतर आपण बाजारात नवनवीन उच्चांक होताना पाहत आहोत. अर्थात, मध्यंतरीच्या काळात, बाजारात नफेखोरीसुद्धा अनुभवली.

हे सर्व अनुभवल्यानंतर बाजारात कायम असणारा प्रश्न उरतोच व तो म्हणजे येथून पुढे बाजाराची वाटचाल काय राहील?

नुकत्याच जाहीर झालेल्या उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अपेक्षेप्रमाणे बाजारात उमटले. या निकालांच्या निमित्ताने देशाला दूरगामी राजकीय स्थैर्य आणि त्या अनुषंगाने बाजाराला नवसंजीवनी मिळाली असून, बाजार आणखी नवे उच्चांक गाठण्याची शक्‍यता आहे. याचा अर्थ बाजार खाली येणारच नाही, असा मुळीच नाही. परंतु हा बाजार नकारात्मक बातम्यादेखील पचवू शकतो व पुढे जातो, ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांमुळे लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतसुद्धा भाजपची ताकद वाढेल व 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा अंदाजसुद्धा या निकालांतून सहज येतो. त्यामुळे सरकारला आर्थिक धोरणे, अथवा सुधारणा राबवणे अजून वेगाने करता येतील, अशी आशा बाळगायला हरकत नसावी. लवकरच लागू होणारी जीएसटी करप्रणाली, सरासरी मॉन्सूनची अपेक्षा, कच्च्या तेलातील भावामध्ये झालेली नफेखोरी, जागतिक बाजारात असलेली तेजी, नोटाबंदीनंतर रुळावर येत असलेली अर्थव्यवथा या सर्वांचा बाजारावर अल्प व दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव असेल व त्यामुळे बाजारासाठी हे वर्ष "राजयोग' असेल, यात शंका नाही. हा अंदाज ("राजयोग') आम्ही नववर्षीच्या प्रारंभीच अधोरेखित केला होता. असे असले तरी केवळ निर्देशांकांच्या तेजीला न भुलता, "स्टॉक स्पेसिफिक ऍप्रोच' ठेवून केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळामध्ये नक्कीच फलदायी ठरेल.

बाजारात तेजीचे वातावरण असताना सतर्क राहणेही गरजेचे असते. कारण अशावेळी दिशाभूल करणारेसुद्धा बाजारात जोरात येतात व आपली संधी या लोकांमुळे हिरावली जाऊ शकते. नोटाबंदीनंतर आलेल्या मंदीसदृश परिस्थितीत, आम्ही ठामपणे सांगत होतो, की बाजारात खरेदी करावी. तेथून पुढे बाजाराने मोठी वाढसुद्धा दाखवली होती व आतासुद्धा बाजार चांगली संधी देईल, असे दिसते. त्यामुळे बाजारात अपेक्षित असणाऱ्या "अच्छे दिन'चा आपणदेखील फायदा करून घ्यायला हवा. त्यासाठी आम्ही वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे, "गुंतवणुकीचे'च धोरण ठेवावे व कोणत्याही आमिषाला बळी पडून सट्टा करणे टाळावे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांनंतर, परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास आणखी सकारात्मक राहतील, असा अंदाज आहे. मागील काही महिन्यांपासून थांबलेल्या त्यांच्या खरेदीने जोर पकडल्यास तो दुग्धशर्करा योग असेल. अशा सर्व गोष्टींचा गुंतवणूकदारांनी लाभ घ्यायला हवा.

-रितेश मुथियान 
श्रीनिवास जाखोटिया 
(डिस्क्‍लेमर: लेखकद्वय "इक्विबुल्स'चे संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com