स्टेट बॅंक ऑफ इंडियाला  2,416 कोटींचा तोटा 

पीटीआय
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

थकीत कर्जे, बॉंडची सुमार कामगिरी यांचा फटका देशातील सर्वात मोठ्या बॅंकेला बसला आहे. पाच सहयोगी बॅंकांना सामावून घेणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाला 31 डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 2 हजार 416 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे

थकीत कर्जांमुळे तिसऱ्या तिमाहीत वाढ 

मुंबई: थकीत कर्जे, बॉंडची सुमार कामगिरी यांचा फटका देशातील सर्वात मोठ्या बॅंकेला बसला आहे. पाच सहयोगी बॅंकांना सामावून घेणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाला 31 डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 2 हजार 416 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बॅंकेला 2 हजार 610 कोटींचा नफा झाला होता.  

तिसऱ्या तिमाहीत थकीत कर्जासाठी बॅंकेला तब्बल 17 हजार 759 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. यामध्ये 145 टक्‍क्‍यांची वाढ झाली. याच तिमाहीत एकूण थकीत कर्जे 1.99 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहेत. सलग तीन तिमाहींमध्ये थकीत कर्जे वाढल्याने बॅंकेला यासाठी मोठी तरतूद करावी लागली आहे. त्याआधीच्या दुसऱ्या तिमाहीअखेर 1.86 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे होती. बॉंडचा परतावा कमी झाल्याचा फटका बॅंकेला बसला आहे. शिवाय कंपन्यांच्या बुडीत कर्जासाठी तरतूद करावी लागली असल्याचे "एसबीआय"चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले. 

बॅंकेला तोटा झाला असला तरी व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात 26.88 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. बॅंकेला 18 हजार 687 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतर स्त्रोतातील उत्पन्नात मात्र 16.3 टक्‍क्‍यांची घट झाली असून, त्यातून 8 हजार 84 कोटी रुपये मिळाल्याचे बॅंकेने म्हटले आहे. समूहातील सहयोगी बॅंकांना सामावून घेतल्यानंतर "एसबीआय' सावरत आहे. सहयोगी बॅंकांचा लेखाजोखा "एसबीआय"मध्ये विलीन झाला असून, त्याचे प्रतिबिंब एकूण कामगिरीवर दिसून आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: State Bank of India posts third-quarter loss